पतंगराव-संजयकाकांची एकमेकांवर स्तुतिसुमने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:02 AM2017-07-23T01:02:30+5:302017-07-23T01:02:30+5:30

बालगंधर्वनगरी नागठाणेत रंगले ‘संगीत मानसन्मान’

Patangrao-Sanjayakake praises each other! | पतंगराव-संजयकाकांची एकमेकांवर स्तुतिसुमने!

पतंगराव-संजयकाकांची एकमेकांवर स्तुतिसुमने!

Next

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : ‘आमचे सध्याचे पक्ष वेगवेगळे आहेत. मी काँग्रेसमध्ये, तर संजयकाका भाजपमध्ये. पण काका मूळचे आमचेच आहेत. हा चांगल्या कामाचा माणूस आहे’, अशा शब्दात माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. त्यावर ‘कदमसाहेबांनी गेल्या चाळीस वर्षांत भान ठेवून योजना आखल्या व बेभान होऊन राबविल्या’, अशा शब्दात संजयकाकांनी कदम यांची स्तुती केली. निमित्त होते नागठाणे (ता. पलूस) येथील नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे.
आ. डॉ. कदम व खासदार पाटील शनिवारी बऱ्याच दिवसांनी एकत्रित आलेले. या दोघांमध्ये काहीतरी कलगीतुरा रंगेल किंवा भाषणांमधून काहीतरी वेगळे अनुभवायला मिळेल, अशी उपस्थितांची अपेक्षा; पण घडले निराळेच! दोघांनी चक्क परस्परांवर कौतुकाचा वर्षाव केला. डॉ. कदम म्हणाले की, एकेकाळी दोन खासदार असणाऱ्या भाजपने केंद्रात व राज्यात सत्ता आणली. भाजपच्या लाटेत बरेच ओंडके वाहून गेले. त्यात आमचे संजयकाकाही होते; पण काका आमच्याच काँग्रेस पक्षाचा माणूस. कर्तबगार नेता म्हणून जनतेने मोठ्या मतांनी निवडून दिले. आम्ही दोघेजण वेगवेगळ्या पक्षाचे आहोत. मात्र समाजहिताच्या मुद्द्यावर आम्ही दोघे एकत्रित आहोत. त्यांनी चांगले काम केल्याने तरुण पिढी त्यांना डोक्यावर घेऊन नाचते आहे. काका कितीही मोठे झाले तरी, त्यांचे पाय जमिनीवर आहेत. आत एक, बाहेर एक असे त्यांचे नाही. ते स्पष्टवक्ते असून, त्यांच्या चांगल्या कामाला आमचा पाठिंबा आहे. आपण काँग्रेसमध्ये दिल्लीवारी न करताही सलग वीस वर्षे मंत्रीपद भोगले व जनतेची सेवा केली.
त्यावर पाटील म्हणाले की, सांगली जिल्हा राजकारणातील धुरंदर जिल्हा आहे. येथे राजकारण करणे म्हणजे औताला बैल जुंपण्यासारखे असते, पण कदम साहेबांनी चाळीस वर्षे समाजकारण व राजकारणात घालविली. ते कर्तबगार आहेत. समाज नेहमी कर्तबगार लोकांची पूजा करतो. साहेबांनी भान ठेवून योजना आखल्या व बेभान होऊन राबविल्या, म्हणून त्यांनी मोठे विश्व उभारले. राजकारणात चढउतार येत असतात. सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतोच! कदम यांनी तर काकांना चांगल्या लोकांच्या सान्निध्यात या, असा सल्ला दिला. वर्तमानपत्रात काहीही छापून आले म्हणून कार्यकर्त्यांनो नाराज होऊ नका. मला बोलून कोणालाही मोठे करायचे नाही. जे हवेत आहेत, त्यांना जनताच जमिनीवर आणेल. आम्ही फक्त काम करत राहू, असे सांगितले.
या कार्यक्रमात एका बाजूला सिनेअभिनेते मोहन जोशी व सुबोध भावे यांच्या मनोगताने मंत्रमुग्ध झालेले रसिक पतंगराव व संजयकाकांमध्ये रंगलेल्या नाट्याचाही आनंद घेत होते.

दोन्ही नेत्यात जवळीकता वाढली
अलीकडे डॉ. पतंगराव कदम आणि संजयकाका पाटील यांच्यामधील जवळीक वाढत आहे. दोघेही परस्परांचे कौतुक करीत आहेत. दोघांच्या बोलण्याचा अप्रत्यक्ष रोख गेल्या आठवड्यात घडलेल्या घटना व नेत्यांच्या दिशेने होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि पतंगराव कदम यांचे राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. अलीकडे देशमुख आणि संजयकाका यांच्यात वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयावरून वितुष्ट आले आहे. त्याची किनार पाटील आणि कदम यांच्या जवळीकीला आहे.

Web Title: Patangrao-Sanjayakake praises each other!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.