रस्त्यांचे पॅचवर्क की, तिजोरीला लावला जातोय चुना; म्हैसाळ-नरवाड मार्गावरील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 01:53 PM2022-03-23T13:53:13+5:302022-03-23T13:53:44+5:30
‘लोकमत’ने म्हैसाळ-नरवाड रस्त्याच्या दुर्दशेचा पंचनामा केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यात मुरूम टाकून पॅचवर्क करण्याची नामी शक्कल लढवली, मात्र खड्ड्यात टाकलेला मुरूम व पॅचवर्क काही दिवसातच निघून गेल्याने पुन्हा मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ-नरवाड या रस्त्यावर पॅचवर्कच्या व देखभाल-दुरूस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखो रूपयांची उधळपट्टी केली जात आहे. पॅचवर्कच्या कामातून शासनाच्या तिजोरीलाच चुना लावण्याचा प्रकार होत असताना त्याचा वाहनधारकांना फटका बसत आहे.
‘लोकमत’ने म्हैसाळ-नरवाड रस्त्याच्या दुर्दशेचा पंचनामा केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यात मुरूम टाकून पॅचवर्क करण्याची नामी शक्कल लढवली, मात्र खड्ड्यात टाकलेला मुरूम व पॅचवर्क काही दिवसातच निघून गेल्याने पुन्हा मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुन्हा पॅचवर्क सुरु झाले आहे.
याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, आता सुरू असणारे पॅचवर्क हे देखभाल-दुरूस्तीसाठीच्या तरतुदीतून सुरू असून त्याची निविदा १३ जून रोजी निघाली आहे. या दुरूस्तीसाठी ४५ लाख ८० हजार रूपयांचा निधी मंजूर आहे.
म्हैसाळ-नरवाड रस्त्यावर महामार्गासाठी लागणाऱ्या मुरूमाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रस्ता पॅचवर्क करण्यास विलंब लागला आहे. अजूनही मुरूम वाहतूक सुरू असून आता वाट न बघता जिथे-जिथे मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे पॅचवर्कने तर काही ठिकाणी खडी टाकून भरून घेतले जात आहेत. या रस्त्यावर गेल्या वर्षभरात शेकडो अपघात झाले असून अनेक जणांना अपंगत्व आले आहे.
आमचे भाऊजी अमनहुल्ला शेख हे म्हैसाळ-नरवाड रस्तावरून प्रवास करत असताना दुचाकी खड्डात जाऊन पडले होते. यानंतर ते कोमामध्ये गेले. दीड महिना हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. जवळपास साडे पाच लाख रूपये खर्च आला आहे. -असिफ बुबनाळे, सामाजिक कार्यकर्ते, म्हैसाळ
म्हैसाळ -नरवाड रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे वारंवार लहान-मोठे अपघात होत आहेत. दुचाकी वरून पडून आठवड्यातून दोन-तीन रूग्ण दवाखान्यात येत आहेत. हा रस्ता होणे गरजेचे आहे. -डॉ.रामगोंड पाटील, ग्रामपंचायत सदस्य, नरवाड