सर्वच पक्षांचा मार्ग खडतर

By admin | Published: September 29, 2014 12:27 AM2014-09-29T00:27:57+5:302014-09-29T00:28:09+5:30

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ : शेंडगे, घोरपडेंमुळे मतविभागणी

The path of all parties is tough | सर्वच पक्षांचा मार्ग खडतर

सर्वच पक्षांचा मार्ग खडतर

Next

अर्जुन कर्पे ल्ल कवठेमहांकाळ
राज्यातील युतीची ताटातूट आणि आघाडीची फाटाफूट झाल्याने तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणेच बदलून गेली आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या सर्वच पक्षांचा मार्ग खडतर झाला आहे. काँग्रेसने सुरेश शेंडगे यांना उमेदवारी देऊन धनगर समाजाच्या मताचे धुव्रीकरण केले. त्यातच अजितराव घोरपडे व शेंडगे दोघेही कवठेमहांकाळ तालुक्यातील असल्याने मतविभागणी अटळ आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात महायुती आणि आघाडीमध्ये निवडणूक लढवली गेली असती, तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांना अजितराव घोरपडे यांच्याशी संघर्ष करावा लागला असता. परंतु युती आणि आघाडीतही घटस्फोट झाल्याने चित्र बदलले आहे.
भाजपकडून अजितराव घोरपडे, तर शिवसेनेकडून महेश खराडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. कॉँग्रेसकडून सुरेश शेंडगे रिंंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादीकडून आर. आर. पाटील रिंगणात उतरले आहेत.
विधानसभा मतदारसंघात भाजपची स्वत:ची अशी ताकद नाही. खा संजय पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांची एकत्रित ताकदच भाजपची ताकद आहे. इतर कोणता पक्ष भाजपच्या मदतीला येण्याची शक्यता कमी आहे.
शिवसेनेचे दिनकर पाटील यांना एका रात्रीत उमेदवारी डावलून शिवसेनेशी काडीचा संबंध नसणाऱ्या व मतदारसंघातील मतदारयादीत नावही नसणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महेश खराडे यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन शिवसैनिकांचा रोष ओढवून घेतला आहे. खराडे यांचा प्रचार न करण्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतल्याने त्यांची मते कोणाला मिळणार व कुणाच्या पथ्यावर पडणार, तेही महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसच्यावतीने सुरेश शेंडगे यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. तत्पूर्वी कवठेमहांकाळ येथे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना उघडपणे मदत करा, असे आदेश दिल्याने कॉँग्रेसचे कार्यकर्ते पाटील यांच्यासाठी कामाला लागले होते. आता आघाडीत घटस्फोट झाल्याने कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आर. आर. पाटील यांचाच प्रचार करणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.
त्यात शेंडगे यांचे ढालगाव परिसरात वर्चस्व आहे. शिवाय कवठेमहांकाळ तालुक्यातील अजितराव घोरपडे व शेंडगे दोघेही रिंगणात असल्याने मतांची विभागणी होईल. त्यांचा नेमका फायदा कोणाला होणार, हे लवकरच कळेल.
एकूणच बदललेल्या राजकीय परिस्थितीत आर. आर. पाटील विरुद्ध अजितराव घोरपडे असाच सामना रंगणार आहे. भाजपचे काही निष्ठावान कार्यकर्ते सध्या नाराज आहेत. ते काय करणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसने कवठेमहांकाळमधून सुरेश शेंडगे यांना उमेदवारी दिली, तर त्यांचे बंधू आ. प्रकाश शेंडगे यांचा भाजपने पत्ता कट केल्याने ऐनवेळी त्यांनी घड्याळ हातात बांधले. प्रकाश शेंडगे जतमधून रिंगणात आहेत. कवठेमहांकाळ व जत हे दोन्ही मतदारसंघ शेजारी-शेजारी असल्याने शेंडगे समर्थक एका मतदारसंघात काँग्रेसचा, तर दुसऱ्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे शेंडगे समर्थकांची दोन्ही मतदारसंघात मोठी कोंडी होणार आहे.

Web Title: The path of all parties is tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.