रुग्ण संपले, कोरोनाचा अदृश्य ताण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 04:44 PM2020-04-24T16:44:33+5:302020-04-24T16:46:46+5:30
गुरुवारी दुपारी दीडपर्यंत फक्त तीस रुग्ण आले होते. एरवी दररोजची संख्या सात-आठशेवर असते. कोरोनामुळे ह्यक्षह्ण किरण तपासणी कक्षावरील ताण मात्र वाढला आहे. श्वसन विकाराच्या प्रत्येक रुग्णाचे स्कॅनिंग करावेच लागते.
संतोष भिसे ।
सांगली : कोरोना आला आणि मिरज शासकीय रुग्णालयाला कडेकोट बंदोबस्तातील किल्ल्याचे स्वरूप आले. शासनाने हे कोविड रुग्णालय घोषित केल्याने सर्वसामान्य रुग्णांचा प्रवेश बंद झाला. संपूर्ण कॅम्पस वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी भरुन गेला. काटेकोर उपचारांनी कोरोनाला परतवण्यात यश आले. सध्या रुग्णालयात एकही कोरोनाबाधित नाही, पण छावणी कायम आहे.
रुग्णालयात प्रवेश करतानाच वातावरणातील गांभीर्य ठळकपणे जाणवते. प्रवेशद्वारात पोलिसांचा तंबू असून चोवीस तास बंदोबस्त तैनात आहे. आतील प्रांगणातही तीन-चार ठिकाणी तंबू आहेत, पण तूर्त तेथे पोलीस नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर रुग्णांची संख्या यदाकदाचित वाढलीच, तर गोंधळ नको, म्हणून आतापासूनच तयारी केली आहे. ओपीडीमध्ये प्रवेश करतानाच सुरक्षा बलाच्या जवानांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते.
फक्त श्वसनासंदर्भात विकार असेल तरच प्रवेश मिळतो, अन्यथा सांगलीच्या सर्वोपचार रुग्णालयात रवानगी होते. एरवी केसपेपर काढल्यावर संबंधित तपासणी कक्षाकडे पाठविले जायचे, पण सध्या केसपेपर खिडकीसमोरच तात्पुरता तपासणी कक्ष सुरू केला आहे. दोघे डॉक्टर तेथेच तपासणी करून पुढील निर्णय घेतात. कोविड रुग्णालय घोषित झाल्यापासून अन्य सर्व रुग्णांनी इकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे दररोजची ओपीडी अवघी तीस-चाळीस रुग्णांवर आली आहे.
गुरुवारी दुपारी दीडपर्यंत फक्त तीस रुग्ण आले होते. एरवी दररोजची संख्या सात-आठशेवर असते. कोरोनामुळे ह्यक्षह्ण किरण तपासणी कक्षावरील ताण मात्र वाढला आहे. श्वसन विकाराच्या प्रत्येक रुग्णाचे स्कॅनिंग करावेच लागते.