वसंतदादा कोविड हॉस्पिटलची रुग्णसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:40+5:302021-05-21T04:27:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या संकटकाळात लोकांना वेळेत बेडची व योग्य उपचाराची उपलब्धता ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या संकटकाळात लोकांना वेळेत बेडची व योग्य उपचाराची उपलब्धता व्हावी म्हणून वसंतदादा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल गुरुवारी सुरू करण्यात आले. संकटकाळात या रुग्णालयाचा रुग्णांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
गर्दी टाळून व शासकीय नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने या हॉस्पिटलचे उद्घाटन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
विशाल पाटील म्हणाले की, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे. अशावेळी लोकांना या आजारातून बाहेर काढल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे रुग्णसेवेचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी हॉस्पिटलला प्रशासकीय मान्यता देण्यात सहकार्य केले.
रुग्णालयासाठी उच्चशिक्षित डॉक्टर्स, आर.एम.ओ, आयुष डॉक्टर्स, नर्सेस तसेच पॅरामेडिकल स्टाफची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार बिलांची आकारणी केली जाणार आहे.
यावेळी उपमहापौर उमेश पाटील, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, संचालक अमित पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, नगरसेवक मनोज सरगर, शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील, पी. एल. रजपूत, उदय पवार, डॉ. कौस्तुभ शिंदे, डॉ. संजय पडळकर, डॉ. पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
चौकट
या रुग्णालयात १०० बेडची व्यवस्था असून त्यातील ४५ आयसीयू बेड असून ७५ बेडना ऑक्सिजन पुरविण्यात आला आहे. त्यामुळे अतिदक्षता विभाग व जनरल वॉर्डही येथे उभारण्यात आला आहे.