रुग्णांची तडफड अन् श्रेयवादाची फडफड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:33+5:302021-05-16T04:25:33+5:30
तासगाव : कोरोनोच्या दुसऱ्या लाटेने तासगाव तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव चव्हाट्यावर आले आहे. तालुक्यात एकीकडे रोज शेकडो लोक ...
तासगाव : कोरोनोच्या दुसऱ्या लाटेने तासगाव तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव चव्हाट्यावर आले आहे. तालुक्यात एकीकडे रोज शेकडो लोक कोरोनोबाधित होत आहेत, तर दुसरीकडे बेडची उपलब्धता मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. बेड मिळत नसल्याने रुग्णांची तडफड सुरू असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून मात्र गुंजभर काम करून श्रेयवादाची फडफड सुरू आहे.
तासगाव तालुक्यात रोज शंभर ते दोनशे रुग्ण कोरोनोबाधित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात आजअखेर तब्बल ७६२९ रुग्ण कोरोनोबाधित झाले असून, त्यापैकी ५६३४ कोरोनोमुक्त झाले आहेत. गृह विलगीकरणात १४१८ रुग्ण उपचार घेत असून, आजअखेर २४९ रुग्णांचा कोरोनोने मृत्यू झाला आहे. तालुक्यात सध्या रुग्णांची संख्या १७४६ असून, विविध रुग्णालयांत ३२८ रुग्ण उपचार घेत आहेत.
रोज पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे, तर तालुक्यात एक खासगी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले कोविड केअर रुग्णालय या तीन रुग्णालयांची एकूण बेडची क्षमता १३२ आहे. त्यापैकी १२९ बेड केवळ ऑक्सिजनचे आहेत, तर तीनच बेड व्हेंटिलेटरचे आहेत.
पहिल्या लाटेत खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले, तर आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालयात कोविडसाठी स्वतंत्र कक्ष आणि सुविधा निर्माण झाल्या. काही प्रमाणात दोन्ही ठिकाणी बेड वाढवण्यात आले. दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे अनेकांचे तडफडून उपचाराअभावी मृत्यू होत आहेत.
तालुक्यात किमान पाचशे बेडची सोय होणे लोकांना अपेक्षित आहे. याकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी तालुक्यातील नेतेमंडळी गुंजभर केलेल्या कामाच्या श्रेयवादाची टिमकी वाजण्यासाठी फडफड करीत आहेत.
वास्तविक, लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक दृष्टिकोनाने धोरणात्मक निर्णय घेऊन तत्काळ सुविधा उपलब्ध करणे अपेक्षित आहे. मात्र, उपचारांअभावी रुग्णांची मरणाच्या दारात तडफड आणि नेत्यांची श्रेयवादाची फडफड सुरू आहे.
चौकट
उपचार करण्याची मर्यादा
तासगाव तालुक्यात पंधरा दिवसांत २२०६ रुग्ण कोरोनोबाधित झाले, तर १६५१ रुग्ण कोरोनोमुक्त झाले. ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. पंधरा दिवसांत तालुक्यातील तिन्ही रुग्णालयांतून सुमारे १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरच्या उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण किमान पाच ते आठ दिवस उपचार घेत असतात. त्यामुळे आठ दिवसांत केवळ १३२ रुग्णांवरच उपचार करण्याची मर्यादा आहे.
चौकट
संस्थांच्या माध्यमातून आणखी सेंटर उभी करा
तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्या लाटेत अवघ्या चार दिवसांत कोविड केअर सेंटर सुरू झाले होते. तासगावातील नेत्यांच्या ताब्यात साखर कारखाने, सूतगिरणी, बाजार समितीसारख्या संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून आणखी कोविड केअर सेंटर उभे राहिल्यास लोकांचा जीव वाचू शकेल, अशी अपेक्षा आहे.