शिंदे गटामुळे पाटील गट अस्वस्थ

By admin | Published: July 26, 2016 11:45 PM2016-07-26T23:45:58+5:302016-07-27T01:06:27+5:30

आष्टा नगरपरिषद : विलासराव शिंदे यांच्या गटाकडे सत्तेच्या चाव्या

Patil group is unwell due to Shinde group | शिंदे गटामुळे पाटील गट अस्वस्थ

शिंदे गटामुळे पाटील गट अस्वस्थ

Next

सुरेंद्र शिराळकर --आष्टा नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आष्टा पालिकेत माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील गट व माजी आ. विलासराव शिंदे गट सत्तेत एकत्र आहेत. सत्तेच्या चाव्या मात्र विलासराव शिंदे गटाकडे असल्याने आ. जयंत पाटील गट अस्वस्थ आहे. अनेक कार्यकर्ते स्वबळाचा नारा देत असल्याने, जयंत पाटील गट स्वबळावर लढणार का? याची शहरात चर्चा सुरू आहे.
आष्टा नगरपरिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. माजी आ. विलासराव शिंदे गट व आ. जयंत पाटील गट सत्तेत आहेत. १९९६ पूर्वी पालिकेत जयंत पाटील गटाची सत्ता होती. मात्र ९६ नंतर आ. जयंत पाटील व विलासराव शिंदे यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे आ. जयंत पाटील गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना अस्तित्वासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.
आष्टा नगरपरिषद हा शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. शिंदे यांनी पालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास साधला आहे. कोट्यवधीच्या योजना राबविल्या आहेत. जनकल्याणाची अनेक कामे केल्याने शिंदे यांची पालिकेवर एकहाती सत्ता आहे. आ. जयंत पाटील यांनी आष्ट्यातील कार्यकर्त्यांना राजारामबापू संकुलात संधी दिली आहे. विराज शिंदे, माणिक शेळके यांना राजारामबापू कारखाना, अशोकराव वग्याणी यांना सर्वोदय कारखाना, तर अनिता वग्याणी यांना राजारामबापू बॅँकेचे संचालकपद दिले आहे. तसेचर शेतकरी विणकरी सह. सूतगिरणीच्या अध्यक्षपदी बबन थोटे यांना संधी दिली आहे, तर मुकुंद इंगळे संचालक आहेत. सतीश माळी यांना युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्षपद दिले आहे. यापूर्वी संग्राम फडतरे यांना राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्षपद, तर जानकास ढोले, बाबासाहेब ढोले यांना कारखाना संचालकपद दिले आहे. आष्टा पालिकेच्या प्रभाग आरक्षणात शहराच्या मध्यवर्ती भागातील सततच्या आरक्षणाबाबत आ. जयंत पाटील गटाचे विराज शिंदे, माणिक शेळके, रघुनाथ जाधव, मोहन गायकवाड, संग्राम फडतरे, जानकास ढोले, विजय मोरे यांनी मुख्याधिकारी पंकज पाटील यांची भेट घेऊन माहिती घेतली व आरक्षणाबाबत आक्षेप नोंदविला. शिंदे गट जयंत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र जयंत पाटील व विलासराव शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यावरच अखेरचा निर्णय असल्याने, सध्या आक्रमक असलेले नेते व कार्यकर्ते लढाईच्यावेळी मैदानात उभे राहून किल्ला लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बहुतांशी संस्था जयंतराव पाटील गटाकडे
आष्टा शहरातील बँक, पतसंस्था, सोसायट्या, पाणी पुरवठा संस्था या बहुतांशी आ. जयंत पाटील गटाच्या ताब्यात आहेत. मात्र पालिकेत शिंदे गटाचे वर्चस्व आहे. आष्टा नगरपरिषद हा शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. शिंदे यांनी पालिकेच्या माध्यमातून आष्टा शहराचा विकास साधला आहे.

Web Title: Patil group is unwell due to Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.