इस्लामपुरात पाटलांची दादागिरी
By admin | Published: April 19, 2016 12:13 AM2016-04-19T00:13:25+5:302016-04-19T00:54:52+5:30
पालिका निवडणुकीआधीच धुळवड : लढती रंगण्याची चिन्हे
अशोक पाटील-- इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपुरातील वातावरण तापू लागले आहे. कुसूमगंध उद्यानासमोरच्या रस्त्यावर गतिरोधकाच्या कारणावरून माजी नगराध्यक्षांचे नातू आणि गेली चाळीस वर्षे पालिकेच्या राजकारणात असलेल्या नेत्याच्या पुत्रामध्ये हमरी-तुमरी झाली. दुसरीकडे इस्लामपूर-पेठ रस्त्यावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या गाडीला ठोकरल्याने त्या पाटलांनी ठोकरणाऱ्याचा ‘समाचार’ घेतला. याचे चित्रिकरण मोबाईलवर करणाऱ्यांनाही पाटलांच्या समर्थकांनी प्रसाद दिला. इस्लामपूर पालिकेतील राजकारणात शहरापेक्षा उरुण परिसरातील पाटील आडनाव असणाऱ्या नेत्यांचे प्राबल्य आहे. पालिकेत काही वर्षांपूर्वी पवार घराणे वरचढ होते. अलीकडील काळात जाधव घराण्यातील काही नेत्यांनीही पालिकेत जम बसवला आहे. या तीन भावकीभोवतीच पालिकेचे राजकारण फिरत असते. आगामी पालिका निवडणुकीतही या तीन भावकीतील मातब्बर उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सध्या शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. यापूर्वी रस्त्यांची कामे सुरू असताना ती निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत बंद पाडण्यात आली होती. यामध्ये पवार भावकीतील दोघे बंधू आघाडीवर होते. आता या बंधंूपैकी एकाने महादेवनगर येथील कुसूमगंध उद्यानासमोर सुरू असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकाच्या कामावरून तेथील ठेकेदाराशी हुज्जत घातली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पाटील भावकीतील डॉक्टर युवा नेत्याने हस्तक्षेप केला. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यानंतर दोघांनीही एकत्रित येऊन या प्रकारावर पडदा पाडला. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास पालिकेतील बडे नेते आणि त्यांचे बंधू आलिशान गाडीतून पेठहून इस्लामपूरकडे येत होते. त्यांची गाडी बसस्थानक परिसरातील अहिंसा चौकात आली असताना, शहरात शीतपेय पुरवठा करणाऱ्या वाहनाची धडक त्यांच्या गाडीला बसली. त्यामध्ये गाडीचे किरकोळ नुकसान झाले. याचा राग आल्यामुळे पाटील बंधंूनी त्या गाडीचालकाची धुलाई केली. तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी याचे चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाटील समर्थकांनी त्यांनाही प्रसाद दिल्याचे समजते. नगरपालिका निवडणुकीआधीच पाटील भावकीची दादागिरी सुरू झाली असून, ही राजकीय धुळवड येत्या काही दिवसांत आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.