सांगलीत शंभरफुटी रस्त्यावर दारूड्या पतीचा खून, डोक्यात घातली पहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:47 PM2019-04-22T14:47:35+5:302019-04-22T14:49:58+5:30
दारू पिऊन दररोज त्रास देणारा पती चंद्रकांत धोंडीराम साळुंखे (वय ४७, रा. अरिहंत कॉलनी, शामरावनगर, सांगली) याचा डोक्यात पहार घालून पत्नीने निर्घृण खून केला. शंभरफुटी रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. घटनेनंतर संशयित पत्नी माधवी चंद्रकांत साळुंखे (वय ३८) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली : दारू पिऊन दररोज त्रास देणारा पती चंद्रकांत धोंडीराम साळुंखे (वय ४७, रा. अरिहंत कॉलनी, शामरावनगर, सांगली) याचा डोक्यात पहार घालून पत्नीने निर्घृण खून केला. शंभरफुटी रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. घटनेनंतर संशयित पत्नी माधवी चंद्रकांत साळुंखे (वय ३८) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
चंद्रकांत साळुंखे याचे गणपती पेठेत चहा विक्रीचे दुकान आहे. त्याला दारूचे व्यसन होते. उभयतांना एक मुलगा आहे. दारू पिऊन कौटुंबिक कारणावरून चंद्रकांत हा पत्नीशी वारंवार भांडण करीत असे. गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने या पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होत होता.
रविवारी सकाळीही त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेऊन, चंद्रकांत साळुंखे याला ताकीद देऊन सोडून दिले. रात्री उशिरा साळुंखे हा मद्यधुंद अवस्थेत घरी गेला. त्याने पत्नीशी पुन्हा भांडण सुरू केले. त्यामुळे रागाच्या भरात माधवी यांनी घरातील लोखंडी पहार घेऊन चंद्रकांत याच्या डोक्यात तीनवेळा प्रहार केला.
वर्मी घाव बसल्याने मोठा रक्तस्राव होऊन चंद्रकांत खाली पडला. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून जमलेल्या शेजारच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पत्नी माधवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.