‘अक्षतां’च्या स्पर्शानं माळरानावरचं ‘फावडं’ पुलकित

By admin | Published: May 5, 2017 10:34 PM2017-05-05T22:34:47+5:302017-05-05T22:56:53+5:30

भोसरेत जवानांचा अनोखा विवाह सोहळा : नवदाम्पत्यांसह वऱ्हाडी मंडळींकडून गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी श्रमदान

The 'Pavandh' on the face of 'Akshathon' is called Pulkit | ‘अक्षतां’च्या स्पर्शानं माळरानावरचं ‘फावडं’ पुलकित

‘अक्षतां’च्या स्पर्शानं माळरानावरचं ‘फावडं’ पुलकित

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : ‘आधी लगीन कोंढाण्याचं...’ ही म्हण शिवकाळातील मावळ्यांनी सार्थ ठरवली होती. आता याच शूरवीरांच्या मातीतल्या लष्करी जवानांनीही तोच कित्ता गिरवत आपल्या विवाहाइतकाच गावचा विकासही महत्त्वाचा असल्याचे जगाला दाखवून दिलंय. खटाव तालुक्यातील भोसरे गावच्या माळरानावर श्रमदान करत-करत दोन दाम्पत्यांनी लग्नाचा बार उडवलाय... म्हणूनच की काय ‘अक्षतां’च्या स्पर्शानंं माळरानावरचं ‘फावडं’ही पुलकित झालंय.
भोसरे गावास सैन्यदलाचा वारसा असून, गावातील सुमारे १५० जवान सीमेवर कार्यरत आहेत, यापैकी अनेक जवान विशेष सुटी घेऊन आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी गावी आले आहेत. जवानांसह गावातील आजी-माजी सैनिक संघटना पाण्यासाठी श्रमदान करीत आहेत.
उन्हाळा आला की आपल्या गावाला कायम दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. या समस्येला कायमचे हद्दपार करायचे असेल तर गाव दुष्काळमुक्त करणे हाच एकमेव पर्याय. आपल्या गावची हीच गरज ओळखून भोसरे येथे राहणाऱ्या व सैन्यदलात कार्यरत असलेल्या सचिन जाधव व सागर पवार या दोन जवानांनी शुक्रवारी (दि. ५) लग्नात होणाऱ्या खर्चाला फाटा देत भोसरे या गावी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पाडला.
गाव पाणीदार व्हावे, यासाठी वर व वधू पक्षाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दोन्ही पक्षांकडील मंडळी व ग्रामस्थ शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भोरसे गावच्या माळरानावर एकत्र आले. या ठिकाणी सचिन जाधव व सागर पवार या जवानांनी नियोजित वधूंच्या गळ्यात पुष्पहार घालून अत्यंत साध्या पद्धनीते विवाह सोहळा पार पडला.
यानंतर नवदाम्पत्यांनी हाती फावडे अन् कुदळ घेऊन श्रमदान केले. त्यांच्याबरोबर उपस्थित वऱ्हाडी मंडळींनीही तब्बल एक तास श्रमदान केले. खर्चाला फाटा देत भोसरे येथे पार पडलेल्या या अनोख्या विवाहसोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महादेव जानकर,
गोरे यांचेही श्रमदान
जायगाव, ता. खटाव येथे श्रमदानातून सुरू असलेल्या ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहिमेची दखल दुग्ध विकास व पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी घेतली. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री जानकर यांनी एक तास श्रमदान करून ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे कौतुकही केले. दुसरीकडे भोसरे येथे उपस्थित वऱ्हाडी मंडळींसह आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनीही श्रमदान केले.
ना घोडे ना वाजंत्री अन् आतषबाजी
लग्न म्हटले की मंगल कार्यालय, घोडे, वाजंत्री, फटाक्यांची आतषबाजी, पाहुणे मंडळींचा थाटमाट असे सर्वसाधारण चित्र समाजात आपण पाहतो. मात्र, भोसरे येथे शुक्रवारी झालेल्या या लग्न सोहळ्यात अशा प्रकारचे कोणतेही चित्र पाहावयास मिळाले नाही. श्रमदानातून लग्न सोहळा पार पाडल्याने हा सोहळा समाजासाठी आदर्शवत असाच ठरला.
अतिरिक्त खर्चाला दिली बगल
भोसरे गावामध्ये सकाळपासून नागरिक, महिला श्रमदानाच्या कामात व्यस्त होते. सकाळी अकरा वाजता श्रमदान केल्यानंतर दुपारी तीन वाजता गावात भोंगा वाजवून सर्व ग्रामस्थ, महिला एकत्रित आले. गावात हळदी समारंभ पार पडल्यानंतर सर्वजण ट्रॅक्टरमधून विवाहस्थळी श्रमदानाच्या ठिकाणी आले. त्यानंतर अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडला. सर्व गावाने वऱ्हाडी मंडळी, ग्रामस्थांच्या जेवणाचा खर्च उचलून लग्न सोहळ्यातील चार लाख रुपये खर्चाची बचत केली.

Web Title: The 'Pavandh' on the face of 'Akshathon' is called Pulkit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.