पाणी योजनांना ५०० कोटी द्या, अन्यथा आंदोलन

By Admin | Published: June 26, 2016 11:34 PM2016-06-26T23:34:55+5:302016-06-27T00:43:36+5:30

गणपतराव देशमुख : आटपाडीतील पाणी परिषदेमध्ये इशारा; तेरा तालुक्यांतील दुष्काळग्रस्त उपस्थित

Pay 500 crores for water schemes, otherwise the agitation | पाणी योजनांना ५०० कोटी द्या, अन्यथा आंदोलन

पाणी योजनांना ५०० कोटी द्या, अन्यथा आंदोलन

googlenewsNext

आटपाडी : टेंभू, म्हैसाळ योजनेला प्रत्येकवर्षी ५०० कोटींची तरतूद करून उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे दर कमी करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा आ. गणपतराव देशमुख यांनी रविवारी आटपाडीतील पाणी परिषदेत दिला.
पाणी संघर्ष चळवळ, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेच्यावतीने येथील भवानी हायस्कूलच्या पटांगणात २४ वी पाणी परिषद रविवारी पार पडली. यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी आ. सुमन पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, प्रा. शरद पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.
आ. देशमुख म्हणाले, टेंभू योजनेचे काम सध्या अतिशय मंदगतीने सुरू आहे. याआधीच्या सरकारने टेंभूसाठी १४० कोटी दिले, तर गेल्यावर्षी या सरकारने ८० कोटी देऊन निम्मी कपात केली आहे. चार-पाच वर्षापूर्वी स्थापना झालेल्या तेलंगणा राज्यात ४५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तरीही महाराष्ट्राच्या २५ टक्के क्षेत्रफळ असणाऱ्या या राज्याने यंदा सिंचनासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली आहे. याउलट १८ टक्के सिंचन असलेल्या महाराष्ट्र शासनाने केवळ ६ हजार कोटी एवढी तरतूद केली आहे. म्हणून टेंभू आणि म्हैसाळ योजनेला दरवर्षी प्रत्येकी ५०० कोटी निधीची तरतूद करावी. उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे दर कमी करण्याचे शासनाने विधानसभेत आश्वासन दिले आहे. येत्या ३ महिन्यात त्यावर कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्याचा निर्धार करूया.
हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी म्हणाले की, हे सरकार नक्षलवाद्यांच्या कारवाया थांबविण्यासाठी पॅकेज देते, पण शेतकऱ्यांना पाणी देत नाही. केवळ फसवेगिरीच्या घोषणा करत आहे. दुष्काळग्रस्तांचा अंत पाहू नका. येत्या ३ महिन्यात जर शासनाने दुष्काळी भागाच्या सिंचन योजनांना पुरेसा निधी दिला नाही, तर सरकारविरुद्ध मोठा संघर्ष करण्यासाठी तयार राहा. दुष्काळी भागातील जनतेने पिढ्यान् पिढ्या दुष्काळ सोसला. आता शासन बंद पाईपलाईनने पाणी देणार असेल, तर ते तातडीने द्यावे. कालवे असोत की पाईपलाईन, यावर तातडीने कारवाई केली नाही, तर योजनांचा खर्च वाढत जातो.
यावेळी आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढले. आता काही भागात पाणी आले, पण योजना पूर्ण झाली नाही. दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम शासन करीत आहे. पावसाळी अधिवेशनात पाणी योजनांच्या पूर्ततेबाबत शासनाला जाब विचारेन. पाण्यासाठी संघर्ष करण्याची व आंदोलनात सहभागी होण्याची माझी तयारी आहे.
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, पाणी चळवळीने आपल्याला संघटित होऊन लढायला शिकविले. आता आपण जलसाक्षरता अभियान राबविले पाहिजे. देशात पीक काढल्यावर पाणीपट्टी दिली जाते. आम्ही पाणी येण्याआधी रोख पैसे भरतोय, पण तेवढे पाणी दिले जात नाही. पाटबंधारे विभाग मापात पाप करत आहे. त्यासाठी पाणी मोजण्यापासून सौरऊर्जेवर पंप चालविण्यापर्यंतचे सगळे तंत्रज्ञान आता आपल्याला शिकावे लागेल. या भागातील सर्व तलाव पाण्याने भरले, तर दुष्काळ नक्की संपेल.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, प्रा. शरद पाटील, बाळासाहेब बागवान, प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. बाबूराव गुरव, चंद्रकांत देशमुख, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. बाळासाहेब नायकवडी, प्रा. आर. एस. चोपडे, व्ही. एन. देशमुख यांची भाषणे झाली. परिषदेस माणगंगा साखर कारखान्याचे भगवान मोरे, जि. प.च्या महिला, बालकल्याण सभापती कुसूम मोटे, सरपंच स्वाती सागर, पं. स. सभापती सुमन देशमुख, उपसभापती भागवत माळी यांच्यासह दुष्काळग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)


नागनाथअण्णा हेच खरे ‘टेंभू’चे जनक
स्वत:ला जे टेंभूचे जनक म्हणतात, ते खरे जनक नाहीत. या योजनेचे खरे जनक हे नागनाथअण्णा आहेत. त्यामुळे इतर कुणीही जनक म्हणू नये, असे आवाहन व्ही. एन. देशमुख यांनी केले. आटपाडीत जनतेच्यावतीने त्यांचे स्मारक उभे करावे, असे आवाहन त्यांनी केले. हणमंतराव देशमुख यांनीही, चुकीच्या पद्धतीने काहीजण मी योजना आणली असे सांगून टेंभूचा जनक असल्याचे सांगतात. त्यांच्यातोंडी नागनाथअण्णांचं नाव येत नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत व्यक्त केली. दरम्यान, अण्णांनी केलेला संघर्ष वाया जाऊ देणार नाही. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आंदोलने करून त्याचे स्वप्न पूर्ण करणार, असा विश्वास वैभव नायकवडी यांनी व्यक्त केला, तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.


परिषदेतील ठराव
टेंभू योजनेच्या उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी प्रतिवर्षी ५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने द्यावा
कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ व सांगोले या तालुक्यातील मुख्य कालवे व पोटकालव्यांसह त्यावरील सर्व पाणी सोडण्याची बांधकामे व लोखंडी दारांची सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत
उरमोडी, नीरा-देवधर, तारळी, ताकारी, धोम-बलकवडी, सांगोले शाखा आदी कृष्णा खोऱ्यातील १३ दुष्काळी तालुक्यांतील योजनांना पुरेसा निधी द्यावा
पाण्याचे समन्यायी वाटप करण्यात यावे. दर माणसी १००० घनमीटर या तत्त्वावर पाण्याचे समन्यायी वाटप करावे
४ दुष्काळी भागातील कृष्णा, कोयना, म्हैसाळ उपसा जलसिंचन मंडळाची काही कार्यालये विदर्भामध्ये हलविली जाणार असल्याचे समजते. ही कार्यालये हलवू नयेत.
४पुढच्या हंगामासाठी बी-बियाणांचे मोफत वाटप करावे.

Web Title: Pay 500 crores for water schemes, otherwise the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.