शेतकऱ्यांचे ४०० रुपये द्या, अन्यथा २ ऑक्टोबरपासून साखर रोखणार; 'स्वाभिमानी'चा इशारा
By अशोक डोंबाळे | Updated: September 21, 2023 14:27 IST2023-09-21T14:27:19+5:302023-09-21T14:27:47+5:30
सांगलीतील दत्त इंडिया, मोहनराव शिंदे कारखान्यावर शेतकऱ्यांची रॅली

शेतकऱ्यांचे ४०० रुपये द्या, अन्यथा २ ऑक्टोबरपासून साखर रोखणार; 'स्वाभिमानी'चा इशारा
सांगली : मागील गळीत हंगामास गेलेल्या ऊसाला प्रति टन ४०० रुपये २ ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजेत, अन्यथा २ ऑक्टोबरपासून कारखान्यांची साखर विक्रीस बाहेर पडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला. थकीत देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी सांगलीतील दत्त इंडिया, मोहनराव शिंदे साखर कारखान्यांवर रॅली काढली होती.
संदीप राजोबा म्हणाले, गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना यामधून चांगला नफा मिळालेला आहे. वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढलेल्या या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.
तोंडावर दसरा आणि दिवाळी आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला पैसे नाहीत. त्यामुळे कारखान्याकडून तातडीने दुसरा हप्ता ४०० रुपये खात्यावर जमा केला पाहिजे. सदरचा दुसरा हप्ता २ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास २ ऑक्टोबरनंतर कारखान्याची साखर अडवून ढोल-ताशा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले, यू. ए. सनदे, संजय खोलकुंबे, बाबासो सांद्रे, वाळवा तालुका अध्यक्ष जगन्नाथ भोसले, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष धन्यकुमार पाटील, बाळासो जाधव, राजेंद्र माने, सम्मेद पाटील, राजू पाटील, नंदकुमार माने, सुधीर जाधव, श्रीकृष्ण पाटील, बाबूराव शिंदे, भीमराव होनमाने, राम पाटील आदी उपस्थित होते.
व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घेणार : मृत्युंजय शिंदे
ऊसाला प्रतिटन ४०० रुपये जादा मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीचा प्रस्ताव दत्त इंडिया व्यवस्थापनाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. यावर व्यवस्थापन जो निर्णय घेईल, त्याची अमंलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दत्त इंडिया कारखान्याचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.