आष्ट्यात सोमलिंग तलावानजीकच्या जागेचा मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:07+5:302021-04-22T04:27:07+5:30
आष्टा : आष्टा शहरातील सोमलिंग तलावानजीक असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतातून आष्टा पालिकेने त्यांना विश्वासात न घेता रस्ता केला आहे. ...
आष्टा : आष्टा शहरातील सोमलिंग तलावानजीक असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतातून आष्टा पालिकेने त्यांना विश्वासात न घेता रस्ता केला आहे. पालिकेने या जागेचा शासन नियमानुसार मोबदला द्यावा किंवा ती जागा परत द्यावी, अशी मागणी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याकडे संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
आष्टा येथील सोमेश्वर हे महादेवाचे मंदिर सोमलिंग तलावानजीक आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी जाण्यासाठी तलावाच्या दक्षिण बाजूने रस्ता आहे. पालिकेने डांबरी रस्ता केला आहे. येथील अशोक मदने, मुबारक इनामदार, रफिक इनामदार, हारुण इनामदार, प्रसाद देसाई, बाळकृष्ण रत्नपारखी, समीर इनामदार, दस्तगीर मणेर या सर्व शेतकऱ्यांनी जुना गट क्रमांक ३५० व नवीन गट क्रमांक १४ मधील जमीन या सर्व शेतकऱ्यांची असून, आष्टा पालिकेने त्यांना विश्वासात न घेता हा रस्ता केला आहे. पालिकेने या जागेचा शासनाच्या नियमानुसार योग्य तो मोबदला द्यावा किंवा संबंधित जमीन आम्हाला परत द्यावी, अशी मागणी या संबंधित शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
अशोक मदने म्हणाले, १९७२ च्या दुष्काळावेळी तलावाचे खोदकाम करण्यात आले व येथील मुरुम माती त्यावेळी मोकळ्या असलेल्या शेजारच्या शेतात टाकण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी टेकडी झालेली आहे. संबंधित जागा आम्हा सर्व शेतकऱ्यांची असून पालिकेने ती जागा आम्हाला परत द्यावी किंवा या जागेचा मोबदला द्यावा, याबाबत सर्व शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले.