Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही

By संतोष भिसे | Published: March 16, 2024 06:04 PM2024-03-16T18:04:39+5:302024-03-16T18:05:05+5:30

सर्वेक्षणासाठी मानधनाची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली होती

Pay Maratha survey work honorarium to teachers immediately, Old Pension Rights Association made the demand | Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही

Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही

सांगली : मराठा सर्वेक्षण कामाचे मानधन शिक्षकांना त्वरित अदा करा अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली. मिरजेत तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना निवेदन दिले.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार २४ ते ३१ जानेवारीदरम्यान जिल्ह्यात सर्वत्र मराठा सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. जिल्ह्यात ५०० हून अधिक प्राथमिक शिक्षक या मोहिमेला जुंपले गेले होते. त्याशिवाय महसूल विभाग आणि महापालिकेचे कर्मचारीही कामाला लावण्यात आले. अवघ्या आठवडाभरात संपूर्ण जिल्हा पिंजून काढत घर टू घर सर्वेक्षण करण्यात आले.

मराठा कुटुंबासाठी तब्बल १५० प्रश्नावलींचा फॉर्म ऑनलाईन भरण्यात आला. अन्य प्रवर्गासाठी १० प्रश्नांचा फॉर्म होता. इंटरनेटचा अभाव, शेतमळ्यातील प्रवास अशा सर्व समस्यांना तोंड देत युद्धस्तरावर सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. शिक्षकांनीही निर्धारित वेळेपेक्षा अगोदरच सर्वेक्षण पूर्ण केले. आयोगाला ते सादरही करण्यात आले. मात्र या कामाचे मानधन अजूनही जमा करण्यात आलेले नाही.

सर्वेक्षणासाठी मानधनाची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली होती. मराठा कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी १०० रुपये, तर इतरांच्या सर्वेक्षणासाठी १० रुपये मानधन होते. सर्वेक्षण पूर्ण होऊन दीड महिना झाला, पण मानधनाची अद्याप प्रतीक्षाच आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनेचे मिरज तालुकाध्यक्ष रमेश मगदुम यांनी तहसीलदार मोरे यांना मानधनासाठी निवेदन दिले. मोरे यांनी सांगितले की, मानधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुदानाची मागणी केली आहे. तेथून प्राप्त होताच शिक्षकांच्या खात्यांवर त्वरित जमा केले जाईल.

आता निवडणुकीचे कारण

दरम्यान, शनिवारपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली. त्यामुळे मानधन जमा करण्यात आचारसंहितेचे कारण प्रशासनाकडून पुढे केले  जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वेक्षण केलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूक संपेपर्यंत प्रतीक्षेतच रहावे लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Pay Maratha survey work honorarium to teachers immediately, Old Pension Rights Association made the demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.