Sangli- पुसेसावळी दंगल: सूत्रधारास अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, एमआयएमचा आरोप
By संतोष भिसे | Published: October 10, 2023 03:42 PM2023-10-10T15:42:07+5:302023-10-10T15:56:49+5:30
त्यामुळे पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते
सांगली : पुसेसावळी (जि. सातार) येथे दंगलीदरम्यान मरण पावलेल्या तरुणाच्या नातेवाईकांना एक कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी एमआयएमने केली. दंगलीमागील सूत्रधारावर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्या अटकेमध्ये पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला.
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले. तत्पूर्वी मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढली. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले.
डॉ. कांबळे म्हणाले, दंगल ओसरल्यानंतर झालेल्या तपासामधून खरे सूत्रधार स्पष्ट झाले आहेत. मरण पावलेला मुस्लिम तरुण किंवा पुसेसावळीतील मुस्लिम धर्मियांचा दंगलीत सहभाग नव्हता हेदेखील स्पष्ट झाले आहे. काही मुस्लिमद्वेष्ट्यांनी कट रचून हल्लाबोल केला व तरुणाची हत्या केली. पोलिसांनी गुन्हे नोंदविले, पण संबंधितांना अटक केली नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते.
पोलिसांनी सूत्रधारांना त्वरित अटक करावी, शासनाने मृत तरुणाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी आहे. यामुळे पुसेसावळीतील मुस्लिम धर्मियांना दिलासा मिळेल. आंदोलनात निलेश वायदंडे, शादाब बारगीर, रियाज ढाले, असिफ इनामदार, अस्लम मुल्ला, ओम पाटील, मुदस्सर मुजावर, एजाज आगलावणे आदी सहभागी झाले.