शिराळ्यात मोराची शिकार, चंदनाची चोरी, वनविभागाचा तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:20 PM2018-05-07T22:20:23+5:302018-05-07T22:20:23+5:30
शिराळा : येथील बाह्य वळण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतामध्ये अज्ञाताने मोराची शिकार केली. तसेच त्याच शेतातील दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे
शिराळा : येथील बाह्य वळण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतामध्ये अज्ञाताने मोराची शिकार केली. तसेच त्याच शेतातील दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शिराळा वनविभागाकडून तपास चालू आहे. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
या रस्त्यावरील कापरी फाट्यापासून काही अंतरावर असणाऱ्या खासगी शेतामध्ये मोराची पिसे तसेच तयार केलेली दगडाची चूल आदी आढळून आले आहे. यावरून अज्ञात व्यक्तींकडून मोराची शिकार करून जेवण केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्याचबरोबर याच शेतीमधील काही अंतरावर दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याचे आढळून आले आहे. मोराची शिकार व चंदनाच्या झाडाची चोरी दोन्ही गुन्ह्यातील संशयित एकच असावेत, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. घटनास्थळी वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, वनरक्षक सचिन पाटील, बाबासाहेब गायकवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
अज्ञातांनी मोराची शिकार व चंदन चोरी केली असून, घटनास्थळी आढळून आलेल्या पुराव्यावरून दोन्ही गुन्ह्यातील संशयित एकच असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक माहितीवरून काही संशयितांची नावे पुढे आली आहेत. त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
- तानाजीराव मुळीक, वनक्षेत्रपाल, शिराळा
शिराळा येथे अज्ञातांनी चंदनाच्या झाडांची चोरी तसेच मोराची शिकार केली आहे.