शेंगदाणा निघाला परदेशी, भाजी चमचमीत करायची कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 06:03 PM2021-11-20T18:03:52+5:302021-11-20T18:04:28+5:30
सांगली : दिवाळीपर्यंत स्थिर असणारा शेंगदाणा आता सरासरी १२० रुपये किलोवर पोहोचला आहे. परदेशी निर्यात वाढल्याने दर तेजीत असल्याचे ...
सांगली : दिवाळीपर्यंत स्थिर असणारा शेंगदाणा आता सरासरी १२० रुपये किलोवर पोहोचला आहे. परदेशी निर्यात वाढल्याने दर तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. स्थानिक शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीकडे पाठ फिरविल्यानेही शेंगदाणा दुर्मिळ होऊ लागला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतीक्षेत्र ऊस, द्राक्षे आणि अन्य नगदी पिकांखाली आले आहे. देशी शेंगा तर पाहायलादेखील मिळेनात, अशी स्थिती आहे. फुले प्रगती वाणाच्या भुईमुगाचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे.
शेंगदाण्याचे दर
महिना - घुंगरू - स्पॅनिश - गुजराती-जाडा
सप्टेंबर - १२५ १३० १२०
ऑक्टोबर १३० १२० ११५
नोव्हेंबर १२० ११५ १०५
जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवर भुईमूग पेरणी
- जिल्ह्यात सुमारे २९ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रात भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे. कवठेमहांकाळ, जत, खानापूर, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव तालुक्यात क्षेत्र मोठे आहे.
- शेंगतेलाची मागणी व किमतीत वाढ होऊनही भुईमुगाचे क्षेत्र मात्र दरवर्षी घटत असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे. फुले प्रगती वाण आघाडीवर असून देशी भुईमूग औषधालाही दिसेनासा झाला आहे.
निर्यात वाढल्याने भावही वाढले
- शेंगदाण्याची परदेशी निर्यात वाढल्याने देशांतर्गत भावही वाढले आहेत. गुजरात, राजस्थान, तमिळनाडू व कर्नाटकातून निर्यातीला माल जावू लागल्याने स्थानिक बाजारपेठेत दरवाढ झाली. स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाली आहे.- अविनाश खोबरे, व्यापारी, सांगली
घरगुती वापरासाठी जास्त तेल असणाऱ्या घुंगरू वाणाला मागणी जास्त आहे. दिवाळीनंतर मागणी घटल्याने दर स्थिर आहेत. गुजरातचा माल खारे शेंगदाणे तयार करण्यासाठी वापरला जातो. त्याचे दर किंचित वाढत आहेत. - गजानन मरगुद्री, व्यापारी, सांगली
शेंगदाण्याशिवाय स्वयंपाक कसा?
शेंगदाण्याचा ५० ते ६० रुपयांचा भाव १२० रुपयांवर गेला तरी पर्याय नाही. शेंगदाण्यांशिवाय स्वयंपाक कसा करायचा? काही भाज्यांमध्ये शेंगदाण्याऐवजी डाळी वापरण्याची कल्पकता दाखवतो. इतर सर्वच मालाचे भाव वाढले असताना शेंगदाणा तरी कसा मागे राहणार? - स्नेहा मोरे, गृहिणी, सांगली.
शेंगदाणे स्वस्त असतात तेव्हा एकदम जास्त प्रमाणात घेऊन ठेवतो. त्यामुळे वर्षभरात दर वाढले तरी झळ बसत नाही. गावाकडूनही हंगामात भुईमूग आणतो. आठवड्याला खरेदी करणे परवडत नाही. स्वयंपाकाशिवाय मुलांना पोषक खाद्य म्हणूनही द्यावे लागतात. - दीपा जतकर, गृहिणी, सांगली