कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोण गिळतो सेफ्टी पिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:06+5:302021-09-07T04:32:06+5:30
सांगली : अल्लड आणि कशाचीही तितकीशी जाणीव नसलेल्या लहान मुलांना प्रत्येक वस्तू ही नावीन्यपूर्ण वाटते. यातूनच ती वस्तू हाताळताना ...
सांगली : अल्लड आणि कशाचीही तितकीशी जाणीव नसलेल्या लहान मुलांना प्रत्येक वस्तू ही नावीन्यपूर्ण वाटते. यातूनच ती वस्तू हाताळताना ती नाकात किंवा तोंडातही घातली जाते आणि ती अडकून राहण्याचे प्रकार घडतात. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या केसेसमध्ये कोणाच्या नाकात शेंगदाणा, काजूचे तुकडे अडकतात, तर कोणी लहान मुले सेफ्टी पिन चघळत चघळत गिळतो त्यामुळे लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येक लहान मुलांना वस्तूचे नावीन्य असते. ते कसे आहे जाणून घेण्यासाठी ते हातात घेतात आणि त्याची चव बघण्यासाठी ती तोंडातही घेतली जाते. यातून असे प्रकार अनेकवेळा घडतात तर अनेकदा जेवण करताना किंवा काही पदार्थ खाताना मूल रडल्यानेही त्यांच्या नाकात किंवा घशात पदार्थ अडकतात. या ‘फॉरेन बाॅडी’ काढण्यासाठी अनेक मुले रुग्णालयात येतच असतात.
चौकट
मुले काय करतील याचा नेम नाही
* रुग्णालयातील डॉक्टरांनी करामती मुलांच्या काही उदाहरणे दिली ज्यात त्यांनी मुलांनी पालकांना घाम फोडला होता.
* ग्रामीण भागातील मुले तोंडात चिंचोका घालतात व तो अडकतो. चिंचोका अडकल्याने मुलांना अडचणी येतात.
* लहान मुले काजू, बदाम खाताना कधी पूर्ण तर कधी त्याचे तुकडे अडकल्यानेही त्यांना त्रास होतो.
* मांसाहार करताना काही मुलांच्या आणि अगदी काही मोठ्यांच्या घशातही हाड अडकल्याच्याही केसेस येत असतात.
चौकट
करामती रुग्णसंख्या कायम
खेळता खेळता किंवा अजाणतेपणाने घशात कोणतीही वस्तू अडकलेले रुग्ण नेहमीच येत असतात. अनेकदा नाकात शेंगदाणा अडकलेले लहान मूल महिनाभरानंतर उपचारासाठी येते. यावेळी पालक त्यांच्या नाकातून घाण वास येत असल्याचे सांगतात.
चौकट
अशी घ्या मुलांची काळजी
* लहान मुलांना कोणताही पदार्थ खाऊ देताना मोठ्या व्यक्ती त्यांच्यासमोर असणे आवश्यक आहे.
* लहान मूल खात असताना, ते रडल्यास असे पदार्थ अडकण्याची किंवा नाकात जाण्याची शक्यता असते.
* लहान मुलांना नवीन कोणतीही वस्तू देताना त्यातील कोणता भाग मुले तोंडाने काढून तर घेणार नाहीत ना याची पाहणी करावी.
चौकट
लहान मुलांच्या नाकात शेंगदाणा अडकला यासह अन्य धान्य अडकल्याच्या केसेस येतात. पालकांनी धान्य निवडताना किंवा खायला काहीही देताना मुलांची विशेष काळजी घ्यावी.
डॉ. रेश्मा चव्हाण, कान, नाक व घसा, विभागप्रमुख, शासकीय रुग्णालय