महाविकास आघाडीच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 05:27 PM2019-12-23T17:27:53+5:302019-12-23T17:29:37+5:30
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या त्रिशंकू सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मंत्री होण्याची आशा वाटत आहे. या सर्वच राजकीय घडामोडीत आणि बहुमताच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते मात्र स्वत:ला हरवून बसले आहेत.
अशोक पाटील
इस्लामपूर : तत्कालीन भाजप, शिवसेना युतीच्या राज्यात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली, परंतु याचा कसलाही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. आता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या त्रिशंकू सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मंत्री होण्याची आशा वाटत आहे. या सर्वच राजकीय घडामोडीत आणि बहुमताच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते मात्र स्वत:ला हरवून बसले आहेत.
इस्लामपूर शहरातील यल्लम्मा चौक येथे झालेल्या भाजपच्या सभेत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सामील व्हावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला साद देत शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाठिंबा दिला होता.
त्यानंतर भाजपच्याच ताकदीवर त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्रीपद देण्यात आले. विशेष म्हणजे कृषी राज्यमंत्रीपद मिळाल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार, असेच वाटत होते. परंतु तसे काहीच घडले नाही. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला यश मिळाले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सत्ताही आली. परंतु महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली. येथेही भाजप-शिवसेनेची सत्ता येता येता तो मान शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळाला. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळालेले सदाभाऊ खोत आता विधानपरिषदेचे सदस्य म्हणूनच राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका-टिप्पणी करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीही राहिले नाही.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नाराज झालेले राजू शेट्टी यांनी प्रतिवर्षीप्रमाणे ऊस परिषद घेतली. यावेळच्या परिषदेला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. त्याची साखरसम्राटांसह ऊस उत्पादकांत चर्चाही झाली नाही.
याचे एकमेव कारण म्हणजे राजू शेट्टी हे साखरसम्राटांच्या बरोबरीने बसलेले शेतकऱ्यांना रुचलेले नाही. हेच मोठे कारण त्यांच्या पराभवासही कारणीभूत ठरले आहे. आता तर त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपणाला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याकडे केली आहे.
एकंदरीत दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेट्टी आणि खोत यांची जोडी आता सत्तेच्या सारीपाटाच्या खेळात गुंतली आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या गोळाबेरजेत हे नेते शेतकऱ्यांपासून दुरावलेत, हे नक्की.