शिराळ्यात आजी-माजी आमदारांत बेडूक, घुशीच्या उपमेने कलगीतुरा-राजकीय वातावरण पुन्हा तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:22 AM2018-04-05T00:22:29+5:302018-04-05T00:22:29+5:30
कोकरुड : उन्हाळ्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली असतानाच, शिराळ्यातील दोन आजी-माजी आमदारांमध्ये बेडूक, घुशीची उपमा देत एकेरी भाषेचा वापर सुरू झाला आहे.
शिवाजी पाटील ।
कोकरुड : उन्हाळ्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली असतानाच, शिराळ्यातील दोन आजी-माजी आमदारांमध्ये बेडूक, घुशीची उपमा देत एकेरी भाषेचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
राजकारणात टीका-टिपणी ही नित्याचीच बाब आहे. प्रत्येकजण आपल्या विरोधकावर टीका करून आपणच श्रेष्ठ असल्याचे भासवतो. २००४ पासून आमदार जयंत पाटील आणि आमदार शिवाजीराव नाईक यांच्यात कायम टीका-टिपणी व्हायची. हे दोन नेते एकमेकांवर प्रत्येक निवडणुकीत आरोप करायचे. या दोघांना जनतेने ‘वाळव्याचा वाघ (जयंत पाटील) आणि शिराळ्याचा नाग (शिवाजीराव नाईक) अशी उपमाही दिली आहे.
मात्र या वाघ-नागाचा वाद कधीही वैयक्तिक पातळीवर गेला नाही. दोन्ही नेत्यांनी जाहीर सभेत आरोप केले असले तरी, अनेक कार्यक्रमांत ते एकत्र आल्याचे दिसले. गेल्या चार वर्षांत आमदार जयंत पाटील व आमदार शिवाजीराव नाईक यांनी एकमेकावर जाहीर टीका केलेली नाही. मात्र जयंत पाटील यांची जागा मानसिंगराव नाईक यांनी घेतली असून, आ. शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक यांच्यात खालच्या पातळीवर येऊन आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या दोन्ही आजी-माजी आमदारांमधील आरोपांची पातळी घसरत चालली आहे. हे दोन्ही नेते वैयक्तिक पातळीवर आरोप करू लागल्याने शिराळा मतदार संघ चांगलाच गरम झाला आहे.
शिवाजीराव नाईक हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असे मानसिंगराव नाईक जाहीर सभेतून सांगत आहेत. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांना ‘बेडूक’ अशी उपमा दिली आहे. यालाच उत्तर म्हणून शिवाजीराव नाईक हे माजी आमदार मानसिंगराव नाईक हे शाहूवाडीत शिवसेनेसोबत, शिराळ्यात काँग्रेसबरोबर, तर वाळव्यात काँग्रेसविरोधात काम करतात. म्हणून त्यांना ‘घुशी’ची उपमा दिली आहे.दोन्ही आजी-माजी आमदारांच्या टीका-टिपणीमुळे करमणूक होत असली तरी, हा वाद वैयक्तिक पातळीवर न जाता राजकारणापुरता मर्यादित राहणे गरजेचे आहे.