ऑक्सिमीटरच्या तपासणीत पेनही झाले सजीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:26+5:302021-05-26T04:28:26+5:30
सांगली : कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी खरेदी केलेल्या ऑक्सिमीटरच्या दर्जाबाबत मंगळवारी स्थायी समितीत प्रश्न उपस्थित करण्यात आला. ...
सांगली : कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी खरेदी केलेल्या ऑक्सिमीटरच्या दर्जाबाबत मंगळवारी स्थायी समितीत प्रश्न उपस्थित करण्यात आला. या ऑक्सिमीटरने पेनाची प्राणवायू पातळी तपासल्याचे नगरसेवक प्रकाश मुळके यांनी सप्रमाण निदर्शनास आणून दिले. या प्रकाराने स्थायी सदस्य अवाक् झाले. अधिकाऱ्यांना मात्र त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत नगरसेवक प्रकाश मुळके यांनी महापालिका प्रशासनाने खरेदी केलेले ऑक्सिमीटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला. हा आरोप सिद्ध करताना मुळके यांनी एका ऑक्सिमीटरद्वारे पेनाची ऑक्सिजन पातळी तपासली. यावेळी ऑक्सिजनची पातळी ९३ तर हृदयाचे ठोके ८० च्या दरम्यान दाखविले. हा सारा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यासह स्थायी समितीसमोर घडला. यावर मुळके यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
ऑक्सिमीटरवर चुकीच्या पद्धतीने ऑक्सिजन दाखविले जात आहे. निर्जिव वस्तूही सजीव होत आहेत. निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची वेळ येईल. त्यामुळे आतापर्यंत खरेदी केलेल्या सर्वच साहित्यांच्या दर्जाबाबत चौकशी करावी, अशी मागणी केली. सदस्यांनीही अधिकाऱ्यांना याचा खुलासा करण्याची सूचना केली; पण अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर गुरुवारी पुन्हा स्थायी सभेत त्यावर चर्चा होणार आहे.