पलूस येथील तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान प्रलंबित काम तातडीने पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:56 PM2021-04-28T17:56:46+5:302021-04-28T18:00:39+5:30
Vishwajeet Kadam Highway Sangli : कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्गावरील पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.
मुंबई : कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्गावरील पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.
सदर बैठकीत राष्ट्रीय महामार्ग क्र.266 अंतर्गत पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यानचे रखडलेले महामार्गाचे काम उपलब्ध जागेत सात मिटर रुंदीने काँक्रीटीकरण करून तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले असून यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.
तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान महामार्गाचे रखडलेच्या कामासंदर्भात मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक डॉ. विश्चजीत कदम यांच्या पुढाकारातून घेण्यात आली.
या बैठकीत व्हिडीओ काँन्फरन्सीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार, राष्ट्रीय महामार्ग सचिव, श्री. विनय देशपांडे, तसेच अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी भाग घेतला. पलूस तहसील कार्यालय येथून जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, जे.के.बापू जाधव, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, वैभवराव पुदाले आदी उपस्थित होते.
विजापूर - गुहागर महामार्गाचे पलूस तालुक्यातील १६ कि.मी अंतराचे काम रखडले आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या मार्गावर सतत लहान-मोठे अपघात होत आहेत. अपघातात काही जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण होणे गरजेचे आहे. अशी भूमिका राज्यमंत्री डॉ. कदम यांनी यावेळी मांडली. त्यानंतर महामार्गाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते यांनी रस्त्याच्या सद्यस्थितीविषयी माहिती सांगितली.
यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सध्या शेतकऱ्यांची याचीका उच्च न्यायालयात आहे, त्यावर न्यायालय जो निर्णय देईल, त्याला अधिन राहुन त्याप्रमाणे भविष्यात काम करता येईल. मात्र, तोपर्यंत थांबून चालणार नाही. सध्या उपलब्ध जागेत सात मिटर रुंदीने तात्काळ रखडलेले काम सुरू करावे. तुपारी फाटा आणि येळावी फाटा या दोन्ही बाजूकडून काम सुरू करावे. म्हणजे काम लवकर पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. यासाठी शेतकरी, नागरिक यांनी सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक श्री. महेंद्र आप्पा लाड , श्री. जे. के.बापू जाधव आदींनी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी भूमिका मांडली.
यावेळी महामार्गाचे मुंबई, पुणे, कोल्हापूर येथून सर्व वरिष्ठ अधिकारी , तसेच पलूस तहसील कार्यालय येथून सुहास पुदाले, गिरिश गोंदिल, मिलिंद डाके, शरद सांडगे, रतन पाटील, विक्रम पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.