प्रलंबित कामे गतीने मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:39 AM2021-02-26T04:39:46+5:302021-02-26T04:39:46+5:30
सांगली : प्रशासनाला शिस्त लावतानाच नागरिक व नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांसह प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे नूतन महापौर ...
सांगली : प्रशासनाला शिस्त लावतानाच नागरिक व नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांसह प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
ते म्हणाले, दर आठवड्याला महापौर कार्यालयात महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली जाईल. मागील आठवड्यात दिलेल्या सूचना, नागरिकांची कामे याचा सतत आढावा घेण्यात येईल. अनेक नागरिक त्यांच्या छोट्या-मोठ्या कामांसाठी पालिका कार्यालयांत हेलपाटे मारत असतात. त्यांची कामे वेळेत होणे आवश्यक आहे. तसेच शासनाकडून विविध कामांचा निपटारा करण्यासाठी महापालिकेचा एक स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येणार आहे. मंत्रालय व पालिका यामधील दुवा म्हणून हा अधिकारी काम करेल. मंत्रालयातील सादर झालेले प्रस्ताव व अन्य कामांचा पाठपुरावा या अधिकाऱ्यामार्फत केला जाणार आहे. महापालिकेचा विकास आराखडा २०१४ मध्ये मंजूर झाला आहे. मात्र याचे नकाशे अद्याप शासन स्तरावर प्रलंबित आहेत. हे मंजूर नकाशे शासनाच्या नगररचना विभागाकडून लवकरात लवकर महापालिकेला कसे मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. नकाशे नसल्याने बांधकाम परवाने, आरक्षणे विकसित करणे व अन्य कामांत अडचणी येत आहेत. महापालिकेचे उत्पन्नही बुडत आहे.
चौकट
वकील पॅनेल सक्षम करणार
महापौर सूर्यवंशी म्हणाले, महापाालिकेचे सुमारे १ हजार १२८ दावे विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. पालिकेच्या पॅनेलवरील काही वकील जाणीवपूर्वक सुनावणींना गैरहजर राहतात. त्यामुळे पालिकेच्या विरोधात एकतर्फी निकाल होत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी पालिकेचे वकील पॅनेल सक्षम करणार आहे.