पलूसमधील सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन थकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:08+5:302020-12-29T04:26:08+5:30
भिलवडी : महिनाअखेर जवळ आली तरीही पलूस तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना नोव्हेंबरमधील पेन्शन आजअखेर मिळाली नाही. ती तत्काळ द्यावी, दप्तर ...
भिलवडी : महिनाअखेर जवळ आली तरीही पलूस तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना नोव्हेंबरमधील पेन्शन आजअखेर मिळाली नाही. ती तत्काळ द्यावी, दप्तर दिरंगाईस जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन हा जगण्याचा आधार आहे. काही शिक्षकांचे वय ९० ते ९५ च्या दरम्यान आहे,हालचाल करता येत नसल्याने कित्येक जण अंथरुणाला खिळून आहेत. त्यांचा औषधपाण्याचा खर्च हा या पेन्शनवर अवलंबून आहे. हक्काची पेन्शन असतानादेखील या मंडळींना आपला चरितार्थ चालविण्यासाठी दुसऱ्या समोर हात पसरण्याची वेळ केवळ दप्तर दिरंगाईमुळे आली आहे. ‘ स्वाभिमानी’ने चौकशी केली असता शिक्षण विभागाकडून अर्थ विभागाला पैसे मागणी अठरा ते वीस तारखेच्यादरम्यान वेळेत केली जात नाही. त्यामुळे अर्थ विभागाकडून ट्रेझरीकडे प्रस्ताव वेळेत जात नाही. शिक्षण, अर्थविभागाची व ट्रेझरी या तीन जबाबदार विभागांपैकी एकाने जर विलंब केला तर याचा त्रास सेवानिवृत्त शिक्षकांना भोगावा लागतो. सांगली जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांंनी सेवानिवृत्त शिक्षकाना न्याय द्यावा. अन्यथा पेन्शनधारकांसह आपल्या दालनात येऊन बसणार असल्याचा इशारा संदीप राजोबा यांनी दिला आहे.