शहरामध्ये संपेनात डास आणि म्हणे तासगावचा झाला विकास!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:11 PM2022-02-01T14:11:55+5:302022-02-01T14:15:31+5:30
कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत कोट्यवधीचा विकास केला. याचा गाजावाजा सुरू आहे; मात्र कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा आहे. सामान्यांना अभिप्रेत विकासकामांऐवजी कारभाऱ्यांच्या सोयीनुसार खर्ची पडलेला निधी कुचकामी ठरला आहे. डासांच्या बाबतीत नेहमीच ‘हाय रिस्क’मध्ये असलेल्या ‘शहरात संपेनात डास; म्हणे तासगावचा विकास’ अशीच निराशाजनक प्रतिक्रिया उमटत आहे.
खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तासगावकरांनी पाच वर्षांपूर्वी भाजपच्या हातात तासगाव नगरपालिकेची सत्ता दिली. खासदारांनी वजन वापरून कोट्यवधीचा निधी शहराच्या विकासासाठी आणला. पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र यातून सामान्य जनतेला होणारा त्रास कितपत कमी झाला, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. गटार फोडून रस्ता, रस्ता फोडून गटार, दगडी फरशी काढून पेव्हिंग ब्लॉक, पेव्हिंग ब्लॉक काढून काँक्रिटीकरण, असा विळा मोडून खुरपे करण्यासारखा विकास गेल्या पाच वर्षांत करण्यात आला.
काम कोणतेही होऊ दे, आमचं चांगभलं झालं पाहिजे, असाच एकूण विकासाचा रागरंग राहिला. स्वच्छतेच्या बेकायदेशीर ठेक्यापासून, लादलेल्या भुयारी गटारीच्या योजनेपर्यंत अनेक कामांवर कोट्यवधी रुपये खर्ची पडले. काम मंजूर करण्याआधीपासूनच स्वहित किती साधले जाईल, याकडे जादा लक्ष असायचे. स्वत:च्या प्रभागात काम होणार असेल तर मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे, यासाठी अनेक आकांडतांडव केले; मात्र कामाच्या दर्जाबाबत नेहमीच मौन धरले.
कोट्यवधींचा दिखावा करण्याऐवजी केवळ डासमुक्त तासगाव शहर केले असते तरीदेखील दिलासा मिळाला असता. शहर अनेक वर्षांपासून सातत्याने डासांच्या घनतेत ‘हाय रिस्क’मध्ये आहे. अगदी जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणातदेखील डासांच्या घनतेचा गृहनिर्देशांक ११.५३ आहे. दहा टक्क्यांच्या खाली शहरातील डासांची घनता कधीच आली नाही. परिणामी खासगी रुग्णालये नेहमीच गर्दीने भरलेले असतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप, मलेरिया अशा साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पाच वर्षांच्या कारभाराचे मूल्यांकन या डासयुक्त तासगाववरूनच दिसून येत आहे.
शाळा, नाट्यगृह कौतुकास्पद
पाच वर्षांच्या नगरपालिकेच्या शाळांनी कात टाकली आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड उपक्रम आणि गुणवत्ता यामुळे शाळांचा नावलौकिक झाला आहे. नगरपालिकेने शाळांबाबत घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. नाट्यगृह नूतनीकरणासारखे काही निर्णय शहराचे हित साधणारे असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.