लोकहो..! दुष्काळाचे भान ठेवत साजरी करुया रंगपंचमी...
By admin | Published: March 27, 2016 11:31 PM2016-03-27T23:31:20+5:302016-03-28T00:04:21+5:30
कोरडी रंगपंचमी साजरी करण्याकडे युवकांचा कल : पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी हवे प्रबोधन--रंगपंचमी विशेष
सांगली : रोजच्या दिनक्रमात थोडासा विरंगुळा आणि रंग भरणारा सण म्हणजे रंगपंचमी... उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना रंगपंचमी येत असल्याने रंगांची बेफाम उधळण आणि पाण्याचा वापर करत मोठ्या आनंदात रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे ‘पाण्याविना’ रंगपंचमी ही कल्पनाही करवत नाही. मात्र, जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात निर्माण झालेली दुष्काळाची दाहकता व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता दुष्काळाचे भान ठेवत पाण्याचा वापर टाळत रंगपंचमी साजरी करायला आता सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.
रंगपंचमीला रंगांबरोबरच पाण्याचा बेसुमार वापर करत नेहमीच रंगपंचमी साजरी केली जाते. वर्षातून एकदा रंगांच्या उधळणीला आणि थोड्या फार रोमांचक क्षणाला कोणाची ना नसावी. मात्र, यंदाच्या वर्षात पाणीबाणी तीव्र झाल्याने रंगपंचमीला पाण्याचा वापर टाळणेच आवश्यक ठरणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळाच्या दाहकतेचा आढावा घेतला तर जिल्ह्यात आता सातशेहून अधिक वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. दोन दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कुठे एक घागर पाणी मिळते आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी मैलो न् मैल भटकंती जिल्ह्याच्या नशिबी आली आहे.
या पार्श्वभूमीवर रंगपंचमीला पाण्याचा वापर टाळता येऊ शकतो. अगदी गेल्या आठवड्यात साजऱ्या झालेल्या होळीला मुंबईसह राज्यातील काही भागात कोरडी होळी साजरी करुन नवीन पायंडा निर्माण होतो आहे.
मोठ्या शहरात काही ठिकाणी ‘एक टिळा होळी’ साजरी करुन पाण्याचा आणि आरोग्याला अपायकारक असणाऱ्या रंगांचाही मर्यादित वापर करण्यात आला आहे. आपल्याकडेही रंगपंचमी साजरी करताना अशा चांगल्या उपक्रमाचे अनुकरण करण्यास कोणाची हरकत नसावी.
आपणही करूया ‘एक टिळा होळी’
पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळी परिस्थितीमुळे रंगपंचमी खेळताना पाण्याचा वापर टाळला पाहिजे. पाण्याचा वापर टाळून रंग खेळला तरी पुन्हा तो धुऊन काढण्यासाठी पाण्याचा जादा वापर आलाच. त्यामुळे यंदाची पाणीबाणी लक्षात घेता राज्यात अन्य ठिकाणी राबविण्यात आलेले ‘एक टिळा होळी’ सारख्या उपक्रम राबविणे आवश्यक आहे.
यंदा जिल्ह्यात टंचाई परिस्थिती गंभीर आहे. शहरातही पाण्याची टंचाई जाणवत आहे. यासाठी फक्त यावर्षी का होईना पाण्याचा वापर न करता रंगपंचमी साजरी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. कोरडी रंगपंचमी साजरी करुन, निसर्गपूरक रंगांचा वापर करूनही आनंद मिळू शकतो. त्यातून खऱ्याअर्थाने सामाजिक भान राखले जाईल.
- डॉ. रवींद्र व्होरा, पर्यावरण तज्ज्ञ
सर्वांनीच गांभीर्याने विचार करत पाण्याचा वापर न करता कोरडी रंगपंचमी साजरी केली पाहिजे. टंचाई परिस्थितीचा सामना करणाऱ्या आपल्याच बांधवांचे होणारे हाल पाहून तर का होईना यंदाच्या रंगपंचमीत रंगांचा मर्यादित वापर केला पाहिजे. पाण्याचा अजिबात वापर न करता रंगपंचमी साजरी करत संपूर्णपणे नैसर्गिक रंग वापरुन आनंद व्दिगणित करुया.
-प्रदीप सुतार, पर्यावरणप्रेमी
संपूर्ण राज्य दुष्काळाच्या गंभीर संकटाला सामोरे जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी धावपळ करावी लागत आहे. हीच परिस्थिती शहरातही आली असून, या टंचाई परिस्थितीचा अजून दोन महिने सामना करावा लागणार आहे. पाण्याचा वापर कमी करणे आणि रंगपंचमीमध्ये पाण्याचा वापरच टाळणे यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. शहरात नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून रंगपंचमीचा आनंद घ्यावा.
- स्वरदा केळकर, नगरसेविका, सांगली,मिरज, कुपवाड, महापालिका