सांगलीकर या निर्णयावर ठाम! म्हणाले, पुणे-मुंबईकरांना देऊ नका सांगलीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:54 PM2020-05-04T13:54:16+5:302020-05-04T13:59:44+5:30
राज्यातील हॉटस्पॉटमधील लोकांना बाहेर सोडले जाणार नाही. परराज्य अथवा पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाईन करण्याच्या शासनाच्या आदेश आहे. तसेच पण काही सोसायट्यात या लोकांना प्रवेश दिला जात नाही.
सांगली : महापालिका क्षेत्रात पुणे, मुंबईतून नागरिक येणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढणार आहे. या नागरिकांना महापालिका क्षेत्रात प्रवेश देऊ नये. हे लोक आले तर त्यांना इन्सिट्युट क्वारंटाईन करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी आॅनलाईन विशेष सभेत केली.
राज्यातील हॉटस्पॉटमधील लोकांना बाहेर सोडले जाणार नाही. परराज्य अथवा पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाईन करण्याच्या शासनाच्या आदेश आहे. तसेच पण काही सोसायट्यात या लोकांना प्रवेश दिला जात नाही. त्यांना कम्युनिटी क्वारंटाईन केले जाईल. दोन हजार लोकांची व्यवस्था होईल, असे नियोजन प्रशासनाच्यावतीने सुरू असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
महापालिकेची विशेष सभा झुम अॅपद्वारे घेण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात प्रथम आॅनलाईन सभा झाली. सभेला ८० हून अधिक नगरसेवक, अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सभेत मुंबई, पुण्याहून येणाºया नागरिकांबाबत नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुंबईतून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यात शहरात मोठ्या संख्येने बाहेरून लोक येणार आहेत. त्यांना महापालिका क्षेत्रात येण्यास अटकाव करावा, अथवा त्यांचे इन्सिट्युट क्वारंटाईन करावे, याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी रोहिणी पाटील, संगीता हारगे, वहिदा नायकवडी, प्रकाश ढंग, निरजंन आवटी यांच्यासह नगरसेवकांनी केली.
होम क्वारंटाईनमधील अनेक लोक बाहेर फिरत असल्याबद्दलही नर्गिस सय्यद, पांडूरंग कोरे, योगेंद्र थोरात यांच्यासह नगरसेवकांनी तक्रारी केल्या.
सभेतील निर्णय
- घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत सक्ती नाही
- परवाने, दाखले घरपोच देण्यासाठी प्रयत्न
- शेरीनाल्याचे पंप सुरू करण्यासाठी प्रयत्न
- महापालिका शाळेत ई लर्निंग सुरू करणार
- अमृत, ड्रेनेजची कामे सुरू होणार
- दिव्यांगानंतर गोरगरीबांना कीट उपलब्ध करून देणार
- सफाई कामगारांना कीट देणार