सातारा जिल्ह्यातील लोक घेत आहेत सांगली जिल्ह्यात लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:45+5:302021-04-28T04:29:45+5:30
कोकरुड : स्थानिकांना वेळेत लस उपलब्ध होत नाही, झालीच तर कमी पुरवठा होतो, असे चित्र असताना आणि जिल्हाबंदी असतानाही, ...
कोकरुड : स्थानिकांना वेळेत लस उपलब्ध होत नाही, झालीच तर कमी पुरवठा होतो, असे चित्र असताना आणि जिल्हाबंदी असतानाही, सातारा जिल्ह्यातील लोकांना लस दिल्याबद्दल येळापूर ग्रामपंचायतीने हरकत घेतली आहे. याबाबत आरोग्य सेविकेस विचारणा करण्यात आली असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
चरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येळापूर येथील उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू आहे. या उपकेंद्रांतर्गत येळापूरसह बारा वाडी-वस्ती आणि गवळेवाडी, हप्पेवाडी, कांबळेवाडी ही गावे येतात. मात्र जवळच केंद्र असल्याने मेणी परिसरातील लाेक लस घेत असल्याने सध्या येथे लस घेणाऱ्यांची संख्या जास्त आणि पुरवठा कमी, अशी स्थिती आहे. अनेकांना रांगा लावूनही लस न घेता परत जावे लागत आहे. अशी स्थिती असताना तसेच जिल्हाबंदी असतानाही सातारा जिल्ह्यातील लाेक मोठ्या संख्येने येळापूर येथे लस घेण्यासाठी येत आहेत. यामुळे परिसरातील रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. येळापूर ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविकेस बोलावून याबाबत विचारणा केली असता, बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना लस दिल्याचे त्यांनी मान्य केले. परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीकडून कोरोनाची बाधा झाली, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करून या प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक लोकांना लस कमी पडत असताना बाहेरच्या जिल्ह्यातील परिचित नसलेल्या आणि तसेच त्या व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाहीत हे माहीत नसताना लस देणे चुकीचे आहे. एखाद्या बाधित व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो.
- दिनकर दिंडे
उपसरपंच, येळापूर.
लस कोणीही, कुठेही घेऊ शकतो. त्याला कसलेही बंधन नाही. जो मागेल त्याला लस देणे बंधनकारक आहे. मात्र जिल्हाबंदी असतानाही हे कसे आले, याबद्दल मला माहिती नसून परजिल्ह्यातील किती जणांना लस दिली हे पाहावे लागेल.
- वासिम जमादार वैद्यकीय अधिकारी, चरण.
आमच्या वाडी-वस्तीवरील लोक शेतातील कामे सोडून तासन् तास रांगेमध्ये उभे राहत आहेत. त्यांना लस संपली, उद्या या असे सांगितले जाते आणि दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांना अगोदर लस देणे हे चुकीचे आहे.
- रघुनाथ लोहार
ग्रामपंचायत, सदस्य