कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जनतेने नियमांचे पालन करावे : डॉ. विश्वजीत कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 05:10 PM2021-03-17T17:10:46+5:302021-03-17T17:13:39+5:30
corona virus Vishwajeet Kadam collector Sangli -कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी समन्वयाने काम करून शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेनेही कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
सांगली : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी समन्वयाने काम करून शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेनेही कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यातील कोराना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील व राहूल रोकडे, उपमहापौर उमेश पाटील, मिरज शासकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरण सुरू असून २८ हजार ४२४ हेल्थ वर्कर्स पैकी २० हजार ५२४ जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १० हजार ३९२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाईन वर्कर्स मध्ये ११ हजार २९३ पैकी ८ हजार ५९६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर २ हजार ५० जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये २९ हजार ७५३ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ४५ वर्षे वयावरील कोमॉर्बीड ५ हजार ४०७ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. जिल्ह्यात एकूण ६४ हजार २८० जणांनी पहिला डोस तर १२ हजार ४४२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचे हे प्रमाण राज्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे.
गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडकपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये विशेषत: आठवडी बाजार यामध्ये गर्दीचे प्रमाण कमी करण्यासाठी अथवा होणाऱ्या गर्दीचे योग्य प्रमाणे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले.
कदम म्हणाले, जिल्ह्यात वसतीगृहामध्ये रहाणाऱ्या विद्यार्थ्यांची वारंवार तपासणी करण्यात यावी. तसेच ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे व जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्या हातावर होम आयसोलेशनचा शिक्का मारावा. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घरासमोर कोविड रूग्ण म्हणून फलक लावण्यात यावेत. सध्या उन्हाचा प्रभाव जास्त असल्यामुळे लसीकरणावेळी योग्य ती दक्षता घेण्यात यावी. लस दिलेल्या व्यक्तीला अर्ध्या तासाची विश्रांती अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरणाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सद्यस्थितीत मागणी असणाऱ्या सर्व सुविधा येत्या काळात वेद्यकीय महाविद्यालयास पुरविण्यात येतील, असे सांगून सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे इत्यादी नियमांचे पालन करावे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठाही पुरेशा प्रमाणात आहे.
जिल्ह्यातील कोरोना स्थितीची सविस्तर माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सध्या दररोज १ हजार इतक्या कोरोना टेस्ट होत असून कोरोनाचा वाढता प्रसार पहाता कोरोना टेस्टींगची संख्या १ हजार ५०० करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यामध्ये शासनाने निर्देशित केलेल्या उपाययोजनांची संबंधित यंत्रणांकडून कडकपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले.