लोकसहभागाने होईल गावांचा कायापालट
By admin | Published: December 10, 2015 12:07 AM2015-12-10T00:07:50+5:302015-12-10T00:53:55+5:30
अजित खताळ यांचे मत : तासगावात ‘लोकमत’चा सरपंच-उपसरपंच विजयोत्सव मेळावा उत्साहात
तासगाव : गावातील लोकांना सहभागी करुन घेतल्यास, प्रशासनही शासकीय योजनांसाठी पुढाकार घेते. त्यामुळे गावाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा घटक असल्याचे मत हिवरे (ता. कोरेगाव, जि. सातारा) चे ‘आदर्श सरपंच’ अजित खताळ यांनी व्यक्त केले. तासगाव येथील समृध्दी मल्टीपर्पज हॉलमध्ये ‘लोकमत’, तसेच कृष्णा पाईप, मांजर्डे आणि पश्चिम महाराष्ट्र पीव्हीसी पाईप डेपो, तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव आणि पलूस तालुक्यातीलनवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा विजयोत्सव मेळावा उत्साहात पार पडला. त्यास तासगाव आणि पलूस तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचेही उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी ‘आदर्श सरपंच’ अजित खताळ, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, कृष्णा पाईपचे संचालक मोहन पाटील, पश्चिम महाराष्ट्र पीव्हीसी पाईप डेपोचे संचालक राजेंद्र पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, सहायक वितरण व्यवस्थापक अमर पाटील, इस्लामपूर प्रतिनिधी अशोक पाटील यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खताळ म्हणाले, पाणलोट व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावातील दुष्काळ हटविण्यासाठी सामाजिक कामास सुरुवात केली. सुरुवातीपासूनच लोकांना सहभागी करुन घेतल्यामुळे गावातील दुष्काळ हटविण्यास मदत झाली.
सरपंच म्हणून काम करताना लोकांचा सहभाग घेत प्रत्येक शासकीय योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. लोकांचा एकमुखी पाठिंबा व सहभाग असल्यामुळे शासकीय यंत्रणेनेही सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे ३३ एकर गायरानात सीताफळ लागवड करणे शक्य झाले.
वनीकरण विभागाने ५४० एकर क्षेत्र ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिले. लोकांचा सहभाग घेत माथा ते पायथा, अशा पध्दतीने जलसंधारणाचे काम केले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही गावातील पाणी पातळी खालावलेली नाही.
गटविकास अधिकारी सतीश गाढवे म्हणाले, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी, विकासासाठी सर्व शक्ती एकत्रित येणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. मात्र गावात नेमके तेच होत नाही. प्रशासनातील सर्व घटकांनी एकत्रित काम करायला हवेच, किंबहुना गावाच्या कारभाऱ्यांनीही राजकीय जोडे ग्रामपंचायतीच्या बाहेर काढून काम करायला हवे. राजकीय महत्त्वाकांक्षेने सहा महिन्यांनी होणाऱ्या सरपंच बदलाच्या पायंड्याने विकासाला खीळ बसत आहे. सरपंचांनी आर्थिक चाव्या हातात घेतल्या तरी, परिस्थिती वाईट आहे. ग्रामपंचायतीने स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करायला हवेत. ग्रामसेवकाकडून महिन्याला खर्चाचा आढावा घ्यायला हवा. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली, तर गावांचा कायापालट निश्चित होईल.
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, गावांच्या विकासासाठी शासनाच्या दीडशेहून अधिक योजना आहेत. निवडणुकीनंतर राजकारण संपवून विकासाला सुरुवात करायला हवी. विकासाची प्रक्रिया सातत्याने सुरु राहिलेली आहे. शासनाकडून थेट ग्रामपंचायतींना पैसा मिळणार आहे, त्याचा फायदा करुन घ्यायला हवा. पाणी योजनांसाठी कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र अद्याप अनेक ठिकाणी पाणी पोहोचलेले नाही, तर काही ठिकाणी योजना सुरु ठेवणे अवघड झाले आहे. सूक्ष्म नियोजन करुन विकास साधायला हवा. अर्थकारण कसे सांभाळायचे, हे ठरवायला हवे. गाव सक्षम करण्यासाठी एकत्रित यायला हवे. ‘लोकमत’ माध्यम म्हणून पुढाकार घेईल. समस्या सोडविण्यासाठी, चांगल्या कामाला प्रसिध्दी देण्यासाठी ‘लोकमत’ सदैव अग्रेसर असेल. ग्रामविकासाचा पाया नव्याने घालण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. त्याला ‘लोकमत’ नेहमीच पाठबळ देईल.
अमर पाटील यांनी स्वागत केले. श्रीनिवास नागे यांनी प्रास्ताविक केले. ‘लोकमत’कडून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा ध्यास जोपासला जात आहे. लोकाभिमुख, नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
सिनेअभिनेत्री प्रणाली उबाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर विक्रम हसबनीस यांनी आभार मानले. वितरण विभागातील अमर पाटील, शशिकांत मोरे, संतोष पाटील यांनी या कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले. (वार्ताहर)
‘लोकमत’चे कौतुक
‘लोकमत’च्यावतीने घेण्यात आलेल्या सरपंच-उपसरपंच विजयोत्सव मेळाव्याच्या निमित्ताने सर्व गावांतील पदाधिकाऱ्यांना एकत्रित करुन विकासाचा मार्ग दाखविण्याचे काम मेळाव्याच्या निमित्ताने झाले. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंचांनी कौतुक केले. अशा पध्दतीचा हा पहिलाच मेळावा आमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सरपंच म्हटले की फेटा, असे समीकरण ठरलेले असते. मात्र अलीकडच्या काळात सरपंच पदावर पन्नास टक्के महिला असतात. महिला सरपंचांनी फेटा परिधान करण्याचा योग तसा दुर्मिळच. मात्र ‘लोकमत’च्या मेळाव्यानिमित्ताने उपस्थित सरपंच, उपसरपंचांनी रूबाबदार फेटा परिधान केला होता. ओंकार गायकवाड यांनी सरपंचांना रूबाबदार फेटे बांधून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
‘कृष्णा पाईप’ कार्यक्रमाचे सहप्रायोजक
कार्यक्रमाचे सहप्रायोजक ‘कृष्णा पाईप’चे संचालक मोहननाना पाटील, पश्चिम महाराष्ट्र पीव्हीसी पाईप डेपोचे संचालक राजेंद्रकाका पाटील होते. या दोन्ही उद्योजकांनी अल्पावधित पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या कार्यातही त्यांचा पुढाकार असतो. कार्यक्रमात समृध्दी हॉलचे संचालक अभिजित पवार यांनीही कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.