टोळ्यांचे नव्हे, लोकांचे ऐकणार
By admin | Published: July 19, 2014 11:21 PM2014-07-19T23:21:16+5:302014-07-19T23:22:44+5:30
पतंगराव कदम : कॉँग्रेसच्या बैठकीत स्पष्टीकरण
सांगली : कॉँग्रेस पक्षात सर्वच ठिकाणी काही टोळ््या कार्यरत आहेत. या टोळ््यांकडून कुरघोड्या चालू असतात. आता कॉँग्रेस पक्ष उमेदवारी ठरविताना या टोळ््यांचे ऐकणार नाही. लोकांची मते आजमावूनच उमेदवार निश्चित केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी पक्षाच्या पूर्वनियोजन बैठकीत दिली.
मार्केट यार्डातील सभागृहात विधानसभा निवडणुकीची पूर्वनियोजन बैठक आज पार पडली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक रमाकांत खलप यावेळी उपस्थित होते. पतंगराव कदम म्हणाले की, गोव्यात खलप यांच्यावर पक्षांतर्गत टोळीकडून बराच अन्याय झाला. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. अशा टोळ््यांचा उपद्रव सगळीकडेच आहे; मात्र पक्षाने आता या टोळ््यांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले आहे. लोकांशी चर्चा करूनच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवार ठरविण्याची भानगडही आता राहणार नाही. प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या नेत्यांना चाचपणी करावी लागेल.
सांगली जिल्ह्यात सध्या मी व सदाशिवराव पाटील दोघेच काँग्रेसचे आमदार आहोत. अन्य तालुक्यांमध्ये सक्षम व लोकांच्या पसंतीच्या उमेदवाराची पाहणी सुरू आहे. मिरज तालुक्यात थोडी अडचण आहे. तरीही आम्ही गावोगाव फिरणार आहोत. कार्यकर्त्यांनीही घरोघरी फिरण्यास सुरुवात करावी. लोकसभेवेळी नवरा आमच्यासोबत आणि बायका-मुले भाजपकडे होती, आता तसे चालणार नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या घरापासून कॉँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करावी. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्रचाराची एक फेरी पूर्ण करावी. तालुका कॉँग्रेस कमिट्या आता सक्रिय व्हायला हव्यात.
रमाकांत खलप म्हणाले की, लोकसभेत गटबाजीमुळे आपली वाताहत झाली. विधानसभेला ती होऊ द्यायची नाही. पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकसंध काम करायला हवे. उमेदवार निश्चित करतानाही प्रत्येक मतदारसंघातून एकच नाव सर्वानुमते निश्चित झाले, तर चांगली ताकद त्यामागे लावता येईल.
शहराध्यक्ष मुन्ना कुरणे म्हणाले की, पंख्याखाली बसून उमेदवार निश्चित केले जाऊ नयेत. अन्यथा लोकसभेसारखी परिस्थिती उद्भवू शकते. (प्रतिनिधी)
गणित बिघडले, तर सत्यजितला संधी
आघाडीचे गणित बिघडले, तर सत्यजित देशमुख यांना संधी मिळेल आणि आघाडीचे जमले तर मग त्यांचे अवघड आहे, अशा शब्दात पतंगरावांनी शिराळ््यातील उमेदवारीबाबत मत स्पष्ट केले.
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, कॉँग्रेसला कधीही राष्ट्रवादीची साथ मिळाली नाही. आघाडी ही कॉँग्रेसच्या फायद्याची नाही. आघाडी करू नये म्हणून निरीक्षकांनी पक्षश्रेष्ठींना सांगावे.
दिगंबर जाधव यांच्या नागरी प्रश्नांच्या रथाचा उल्लेख करताना पतंगराव म्हणाले की, दिगंबरने एक रथ केला आहे म्हणे. मी तो पाहिलाच नाही. पतंगरावांनी केलेला हा इशारा होता की टोमणा, असा प्रश्न मदन पाटील समर्थकांना पडला होता.
कॉँग्रेसमध्ये अचानक उमेदवारी देण्याच्या प्रकाराबाबत पतंगरावांनी धत्तुरेंचे उदाहरण दिले. निरीक्षकांकडे पहात ते म्हणाले की, समोर बसलेले दाढीवाले आहेत ना, तेच धत्तुरे. त्यांना पक्षाने अचानक उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. ऐनवेळी तिकीट मिळाले तरीही आम्ही जोमाने प्रचार केला. दोनवेळा त्यांनी आमदारकी भूषविली.