शहरातील १६ कोटीच्या कामांना स्थायीची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:22+5:302021-05-05T04:43:22+5:30
सांगली : शहरातील काळी खण सुशोभिकरणासाठी १ कोटी २८ लाख रुपये तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या सुशोभिकरणासाठी ३ कोटी ...
सांगली : शहरातील काळी खण सुशोभिकरणासाठी १ कोटी २८ लाख रुपये तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या सुशोभिकरणासाठी ३ कोटी २८ लाख रुपये तसेच दलित नागरी वस्तीमधील १२ कोटींच्या अशा १६ कोटी रुपयांच्या कामांना सोमवारी स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. या दोन्ही कामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध करून प्रत्यक्षात कामाला सुरूवात करणार असल्याचे सभापती पांडुरंग कोरे यांनी सांगितले. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा पाटील सभागृहात पार पडली. या सभेत काळी खणीसाठी सव्वा कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यातून उद्यान, रेलिंग, डेस्क स्लॅब, इलेक्ट्रिक तसेच अन्य कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये सुसज्ज जॉगिंग ट्रक, क्रिकेट मैदान, कंपाऊंड तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईप बसविण्यात येणार आहे. या कामांची निविदा काढण्यासही सभेत मान्यता देण्यात आली.
दलित नागरी वस्तीतील १० कोटींच्या ५८ तर दलितेतर वस्तीतील १ कोटी ९८ लाख ३४ हजार रुपयांच्या १४ कामांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील पथदिवे दुरुस्तीसाठी १ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली.
दहा सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत भाजपचे गजानन मगदूम यांनी प्रशासनाला जाब विचारला. उपायुक्त राहुल रोकडे यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगताच मगदूम संतापले. या नियुक्त्या रद्द करा, त्याशिवाय सभा चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला, यावर सभापती कोरे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
चौकट
शहरातील ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांना कोरोना लसीकरणाचा पहिला डोस देऊन दीड महिना झाला आहे. त्यांना दुसरा डोस मिळालेला नाही. त्यासाठी लसीचा तुटवडा असल्याचे कारण दिले जात आहे. प्रशासनाने जादा लसीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी नगरसेविका सविता मदने यांनी केली.