अडीच कोटीच्या कामांसाठी ‘स्थायी’ थांबली

By admin | Published: March 24, 2016 11:00 PM2016-03-24T23:00:00+5:302016-03-24T23:47:49+5:30

सभेतच स्वाक्षऱ्या : ठेकेदाराच्या वर्कआॅर्डरचा मार्ग मोकळा; समन्स देण्याची प्रक्रिया केली तातडीने पूर्ण

'Permanent' stopped for 25 crore works | अडीच कोटीच्या कामांसाठी ‘स्थायी’ थांबली

अडीच कोटीच्या कामांसाठी ‘स्थायी’ थांबली

Next

सांगली : अडीच कोटी रुपयांच्या मंजूर निविदेची प्रक्रिया रेंगाळल्याने महापालिकेच्या स्थायी समितीची सभा अर्धा तास थांबविण्यात आल्याचा प्रकार बुधवारी घडला. अधिकाऱ्यांना याप्रश्नी धारेवर धरण्यात आले. शेवटी सभेतच अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करून स्वाक्षऱ्या घेऊन समन्स व दर मंजुरीची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
सभापती संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी स्थायी समितीची सभा पार पडली. कुपवाड ते भारत सूतगिरणी आणि लक्ष्मी देऊळ ते चैत्रबन नाला या दोन रस्त्यांच्या कामाचा विषय सर्वाधिक चर्चेत आला. कुपवाड ते भारत सूतगिरणी या रस्त्याच्या कामावरून महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागात गोंधळ निर्माण झाला होता. महापालिकेने या रस्त्याच्या कामासाठी दीड कोटीची निविदा प्रसिद्ध केली आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्डमधून अडीच कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे दोन्ही विभागांची एकत्रित बैठक घेऊन त्यातून मार्ग काढला जाणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले होते. बुधवारच्या सभेत इतिवृत्त मंजुरीवेळी ठेकेदाराला अद्याप दर मंजुरीचे पत्र व समन्स दिली नसल्याचे स्पष्ट झाले. सभापतींनी याबाबत विचारणा केली. ३१ टक्के काम कमी दराने मंजूर करताना, त्याचा दर्जा कसा राखला जाणार, याबाबत विचारणा करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दर मंजुरीची प्रक्रिया व समन्स तातडीने दिल्याशिवाय सभा पुढे चालणार नाही, असे सभापतींनी स्पष्ट केले. त्यानंतर लागलीच अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन, आयुक्तांकडील स्वाक्षरीची औपचारिकता पूर्ण करून, ठेकेदाराला काम करण्यासाठी हवी असलेली सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यासाठी स्थायी समिती सभा थांबविण्यात आली.
कुपवाड शहराकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी नागरिकांनी आंदोलन केले होते. महापालिकेने या रस्त्याचे काम करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानुसार पालिकेने १ कोटी ५३ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. सूतगिरणी ते कुपवाड बेकरीपर्यंतचा एक किलोमीटर रस्ता पूर्ण १८ मीटर लांबीने करण्यात येणार आहे. या कामासाठी ३१ टक्के कमी दराने निविदा दाखल झाली आहे. ठेकेदाराकडून कमी दराने काम कसे परवडते?, याचा खुलासा घेऊन समन्स देण्याचे आदेश सभापती पाटील यांनी मागील सभेत दिले होते.
दरम्यान, याच रस्त्यासाठी नाबार्ड योजनेतून अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, याची माहिती मिळताच महापालिकेने ‘पीडब्ल्यूडी’शी संपर्क साधला होता. नाबार्डकडून मंजूर कामात रस्ता सात मीटरने होणार आहे. त्यामुळे दोन्ही विभागाचे अधिकारी, उपमहापौर विजय घाडगे, शहर अभियंता, आयुक्त अशी एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार होता. मात्र, महापालिकेच्या स्थायी समितीत आता पुढील प्रक्र्रियेला हिरवा कंदिल दर्शविला आहे. (प्रतिनिधी)


सभेतील अन्य निर्णय...
पुरेशी सुरक्षा अनामत घेऊन, सर्वात जादा दराच्या निविदाधारकासच महापालिका क्षेत्रातील होर्डिंगचा ठेका देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्याच्याकडे जुनी थकबाकी असल्याने दुसऱ्या क्रमांकाच्या निविदाधारकास ठेका देण्याचा प्रयत्न हाणून पाडला. वर्कआॅर्डर देण्यापूर्वी जुनी थकबाकी भरून घेण्याची सूचना सभापतींनी दिली. त्याचबरोबर डुकरे पकडण्यासाठी लवकरात लवकर ठेका देण्याचे आदेश त्यांनी दिले.

तीन कामांचा समावेश
कुपवाड लक्ष्मी देऊळ ते चैत्रबन नाल्यापर्यंतच्या रस्त्याचे काम ७१ लाख रुपयांचे आहे. या कामाची वर्कआॅर्डरही देण्यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आले. त्यासाठीची कागदोपत्री पूर्तताही करण्यात आली. खोजा कॉलनीच्या पिछाडीस असलेल्या रस्त्याचे ४४ लाखाचे कामही मंजूर झाले आहे. अशी एकूण अडीच कोटी रुपयांची कामे मार्गी लावण्यात आली.


नवा संशयकल्लोळ
अन्य विभागांशी चर्चा न करताच महापालिकेने परस्पर या कामासाठी तत्परता दाखविल्यामुळे महापालिकेत नवा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनीही, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून माहिती मागविणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.ं

Web Title: 'Permanent' stopped for 25 crore works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.