लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांना चार दिवसांत परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:46+5:302021-03-04T04:47:46+5:30
सांगली : साठ वर्षांवरील नागरिकांच्या तसेच ४५ ते ५९ वर्षांच्या व्याधीग्रस्तांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांची निश्चिती मंगळवारीही होऊ शकली ...
सांगली : साठ वर्षांवरील नागरिकांच्या तसेच ४५ ते ५९ वर्षांच्या व्याधीग्रस्तांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांची निश्चिती मंगळवारीही होऊ शकली नाही. सोमवारपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ६१८ नागरिकांकडून १३ लाख ७६ हजार ६०० रुपये दंड वसूल केल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील उपस्थित होते. डॉ. पोरे म्हणाले, २१ शासकीय रुग्णालयांत सध्या लस देण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये १० ग्रामीण रुग्णालये, ८ महापालिका आरोग्य केंद्रे व तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. आतापर्यंत लसीचे ८२ हजार डोस जिल्ह्याला मिळाले आहेत, त्यातील ४० हजार डोस शिल्लक आहेत. सोमवारी पोर्टल विस्कळीत असल्याने गतीने लसीकरण होऊ शकले नाही, मंगळवारी काहीशी सुधारणा झाली आहे. महात्मा फुले योजनेत समाविष्ट असणाऱ्या २७ खासगी रुग्णालयांतदेखील लस देण्याची सोय करणार आहोत. त्यासाठी त्यांची तपासणी सुरू आहे. लसीकरणानंतर विश्रांतीची सोय, अतिदक्षता विभाग, लस शीत वातावरणात ठेवण्यासाठी सोय यांची पाहणी करत आहोत.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, महापालिका क्षेत्रात विनामास्क ५३३ नागरिकांकडून १ लाख ६० हजार रुपये तर ग्रामीण भागात ६ हजार ८५ नागरिकांकडून १२ लाख १६ हजार ६०० रुपयांची दंडवसुली केली आहे. ग्रामीण भागात पथकांनी सुमारे ४ हजार १०१ ठिकाणी तपासण्या केल्या. १० मंगल कार्यालये, २७ उपहारगृहे, ३ मॉल, १ धार्मिक स्थळ, १० इतर सार्वजनिक स्थळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसले. महापालिका क्षेत्रात सोशल डिस्टन्सिंग भंगाबद्दल ५२ ठिकाणी ३६ हजार रुपयांचा दंड केला. एका मॉलला २० हजार रुपये, ५ मंगल कार्यालयांना ८ हजार रुपये, एका केटरिंगला १० हजार रुपये, एका फेस्टिवल मॉलला २० हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ९७ जणांना ९ हजार ७०० रुपये असा एकूण २ लाख ७ हजार ७०० रुपये दंड केला आहे.