शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या कमानीस परवानगी नाकारली, मिरजेत ठाकरे गटाचे पोलिसांविरोधात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 12:59 PM2022-09-03T12:59:13+5:302022-09-03T13:01:05+5:30
यंदा मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानीना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावर्षी स्वागत कमानीवर ठाकरे गट व शिंदे गटाने दावा केल्याने हा वाद पोलिसांत पोहोचला आहे.
मिरज : मिरजेत विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्वागत कमानीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी हक्क सांगितल्याने पोलिसांनी दोन्ही गटांना स्वागत कमानीस परवानगी नाकारली आहे. स्वागत कमानीस परवानगी न देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विसर्जन मिरवणूक मार्गावरील भव्य स्वागत कमानी मिरजेतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. यंदा मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानीना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावर्षी स्वागत कमानीवर ठाकरे गट व शिंदे गटाने दावा केल्याने हा वाद पोलिसांत पोहोचला आहे. आठवडाभर स्वागत कमानीची परवानगी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. दोन्ही गटांनी माघार घेण्यास नकार दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कमानीस परवानगी नाकारल्याची लेखी सूचना शुक्रवारी दोन्ही गटांना दिली. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने कमानीस परवागनी मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला.
जिल्हाप्रमुख विभुते व माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी ४० वर्षांच्या परंपरेनुसार शिवसेनेच्या स्वागत कमानीला परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली. परवानगी मिळेपर्यंत कमानीच्या जागेवर शुक्रवारपासून शिवसेना कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला. पोलिसांनी आम्हाला तुरुंगात टाकावे किंवा कमानीला परवानगी द्यावी, याबाबत आता माघार घेणार नसल्याचेही विभुते यांनी सांगितले.
यावेळी तानाजी सातपुते, संदीप माळी, सुनीता मोरे, चंद्रकांत मैगुरे, आनंद रजपूत, केदार गुरव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
संघर्षाची चिन्हे
ठाकरे गटाच्या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेसह निष्ठा सर्वोच्च असल्याचा संदेश आहे. शिंदे गटाच्या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आहे. मात्र दोन्ही कमानींना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने यावरून संघर्षाची चिन्हे आहेत.