डाळिंब पीक विम्यास तलाठी दाखल्याने खोडा- आॅनलाईन अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:46 AM2018-07-15T00:46:41+5:302018-07-15T00:50:34+5:30
प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही
गजानन पाटील ।
संख : प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही दाखले देता येत नाहीत. त्यामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचणी आल्या आहेत. डाळिंब नोंदीचे उतारे मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदी करून उतारे आणावे लागत आहेत. आॅनलाईन नोंद वेळखाऊ आहे. तलाठी दाखल्याच्या अटीमुळे डाळिंब विमा भरण्यास खोडा बसला आहे. अनेक शेतकºयांना डाळिंब पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकºयांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने मदत होईल. ही बाब विचारात घेऊन फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबविली जात आहे. डाळिंब फळबागेसाठी १४ जुलै ही सहभागी होण्यास मुदत होती.
सांगली, सातारा, सोलापूर, अकोला, जालना, बुलडाणा, बीड, पुणे, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील डाळिंब फळबागांसाठी टाटा ए आय जी इन्शुरन्स कंपनीकडून विमा दिला जाणार आहे. तालुक्यामध्ये डाळिंब क्षेत्र १२ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. उजाड अशा माळरानावर बागा फुलवल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला आहे.
विमा कंपन्यांनी विविध कागदपत्रांसह डाळिंब लागवडीच्या तलाठी दाखल्याची अट घातली आहे. दुसºया बाजूला तलाठ्यांना दाखले देण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे डाळिंब लागवडीचे दाखले मिळत नसल्यामुळे शेतकºयांचा विमा बॅँका भरून घेत नाहीत. उताºयावरील लागवडीवर शंका उपस्थित केल्या जातात. बॅँका तलाठ्याचाच दाखला मागत आहेत. कृषी सहायक किंवा कृषी अधिकाºयाचे दाखले स्वीकारले जात नाहीत. अलीकडे नवीन लागण केलेल्या डाळिंबाची उताºयावर नोंद नाही. त्यामुळे अशा शेतकºयांवर डाळिंब विमा भरण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
विम्यासाठी विमा फॉर्म, ७/१२ उतारा, खाते उतारा, लागवडीचा दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र झेरॉक्स, बॅँक पासबुक, तलाठ्याचा दाखला, स्वयंघोषित पत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
बँकांकडूनही असहकार्य : शेतकरी नाराज
जळीत पीक विमा भरण्यासाठी बँकेकडूनही शेतकºयांना सहकार्य मिळत नाही. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमध्ये शेतकरी हेलपाटे मारत आहेत. दरीबडची येथे अजूनही विमा भरण्यास सुरुवात झालेली नव्हती.
डाळिंब फळपीक दृष्टिक्षेप...
लागवडीचे क्षेत्र- १२ हजार ३४४.५९ हेक्टर
हेक्टरी विमा रक्कम - ६०५० रुपये
एकूण विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) - १ लाख २१ हजार
डाळिंब लागवडीच्या दाखल्याची अट शिथिल करून शेतकºयांना विमा भरण्यास मुभा द्यावी, तरच शेतकºयांना लाभ मिळेल. शासनाने यामध्ये लक्ष घालून दाखल्याची अट शिथिल न केल्यास जत, आटपाडी, कवठेमहांकाळ दुष्काळी भागातील शेतकºयांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
- विक्रम ढोणे