आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांविरुध्द उच्च न्यायालयात याचिका : मिरज महापालिकेवर दगडफेक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:07 PM2018-09-04T22:07:43+5:302018-09-04T22:08:17+5:30

 Petition filed against 28 people, including former Corporators, in the High Court | आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांविरुध्द उच्च न्यायालयात याचिका : मिरज महापालिकेवर दगडफेक प्रकरण

आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांविरुध्द उच्च न्यायालयात याचिका : मिरज महापालिकेवर दगडफेक प्रकरण

Next
ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान

मिरज : महापालिकेवर दगडफेकप्रकरणी मिरजेतील आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरूध्द जिल्हा सुधार समितीचे तानाजी रुईकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिकेच्या इमारतीची नुकसान भरपाई संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

दहा वर्षांपूर्वी मिरजेतील रस्ते व पाणीप्रश्नी महापालिकेच्या मिरज कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढून दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तत्कालीन नगरसेवक इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, आनंदा देवमाने, महादेव कुरणे, सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, विवेक कांबळे, समित कदम, महादेव कोरे, शिवसेनेचे बजरंग पाटील, रिक्षा संघटनेचे इलियास शेख, सुफी भोकरे, यासीन खतीब यांच्यासह २८ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मिरज न्यायालयाने २८ जणांना दोन वर्षे कैदेची शिक्षा दिली होती. शिक्षेच्या निर्णयाविरूध्द आजी-माजी नगरसेवकांनी जिल्हा न्यायालयात अपील केले होते. जिल्हा न्यायालयाने २० एप्रिल रोजी सर्व २८ जणांची शिक्षा रद्द ठरविली. या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पोलीस व महापालिकेने अपील केले नसल्याने, सुधार समितीचे तानाजी रुईकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मिरज न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आजी-माजी नगरसेवकांची शिक्षा कायम करुन त्यांच्याकडून महापालिकेच्या नुकसानीची भरपाई वसूल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

निवडून आलेल्या नगरसेवकांवर टांगती तलवार
महापालिकेवर दगडफेकप्रकरणी न्यायालयाने आजी-माजी नगरसेवकांना दोषी ठरविल्याने गत महापालिका निवडणुकीत इद्रिस नायकवडी यांची उमेदवारी अपात्र ठरली, तर मैनुद्दीन बागवान व सुरेश आवटी यांच्याविरूध्द न्यायालयात याचिका दाखल झाल्याने त्यांना कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्यात आली होती. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेल्याने, निवडून आलेल्या नगरसेवकांवर टांगती तलवार आहे.

 

Web Title:  Petition filed against 28 people, including former Corporators, in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.