सांगलीपेक्षा कर्नाटकात पेट्रोल, डिझेल स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 06:48 PM2021-06-18T18:48:21+5:302021-06-18T18:52:49+5:30
Petrol Pump Rate Sangli-karnataka : सांगलीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कर्नाटकपेक्षा जास्त आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वाहनचालक इंधनासाठी कर्नाटकमधील पंपांवर धाव घेत आहेत. याचा फटका सीमाभागातील महाराष्ट्रीय पंपांना बसत आहे.
संतोष भिसे
सांगली : सांगलीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कर्नाटकपेक्षा जास्त आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वाहनचालक इंधनासाठी कर्नाटकमधील पंपांवर धाव घेत आहेत. याचा फटका सीमाभागातील महाराष्ट्रीय पंपांना बसत आहे.
इंधनावरील राज्यांच्या कर आकारणीमधील फरकामुळे कर्नाटकात इंधन काही प्रमाणात स्वस्त आहे. पेट्रोल प्रतिलिटर अडीच रुपयांनी तर डिझेल ७० पैशांनी स्वस्त आहे. सांगलीत गुरुवारचे पेट्रोलचे दर १०२.६२ पैसे होेते. शहरापासून दूरच्या गावांत तसेच जत, आटपाडी भागात १०३ रुपये होते. डिझेल सांगलीत ९३.२३ रुपये तर सीमाभागातील गावांत ९४ रुपये प्रतिलिटरने विकले जात होते.
कर्नाटकात पेट्रोलमध्ये अडीच ते तीन रुपयांची बचत होत असल्याने तसेच डिझेल सुमारे रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने वाहनचालकांचा ओढा कर्नाटकातील पंपांकडेच आहे. जत, मिरज या सीमाभागाशी संलग्न तालुक्यांमध्ये पंपांवरील विक्रीला याचा फटका बसतो.
वाहनचालक काही किलोमीटर अंतरावरील कर्नाटकात जाऊन तेल भरुन घेतात. कामानिमित्त कर्नाटकात गेल्यावर येतानाच टाकी फुल्ल करुन घेतात. मोठा वाहनांची यामध्ये मोठी बचत होते. डिझेलची खरेदी एकावेळी ५०, १०० लिटरने होते, त्यामुळे थेट तितकेच पैसे वाचतात. भाड्याच्या निमित्ताने कर्नाटकात जाणारी वाहनेदेखील तिकडेच डिझेल भरुन पुढे मार्गस्थ होतात.
जत, मिरज तालुक्यातील पंपांचे नुकसान
सीमाभागातील म्हैसाळ, आरग, बेडग, सलगरे यासह संख, उमदी आदी गावांतील पंपांचा व्यवसाय यामुळे थंडावते. काही वर्षांपूर्वी कर्नाटकपेक्षा स्वस्त पेट्रोलचे फलक महाराष्ट्रातील पंपांवर झळकले होते, आता परिस्थिती नेमकी उलट आहे.
सांगलीत प्रतिलिटर दर
- पेट्रोल १०२.६२ पैसे
- डिझेल ९३.२३
अथणी येथे प्रतिलिटर दर
- पेट्रोल १००.१०
- डिझेल ९२.५७
सीमाभागातील पंपचालकांना याचा मोठा फटका बसतो. सध्या महाराष्ट्र व कर्नाटकातील डिझेलच्या किंमतीत फार फरक नाही, पण पेट्रोल कर्नाटकात दोन ते अडीच रुपयांनी स्वस्त आहे. कर्नाटकशी संलग्न गावातील वाहनचालकांचा कल कर्नाटककडे आहे.
- सत्यजीत पाटील,
पंप चालक, सांगली