पेट्रोल @ १०२ रुपये, डिझेल ९२ रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:31+5:302021-06-05T04:20:31+5:30
सांगली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची चढती कमान शुक्रवारीही कायम राहिली. पेट्रोलचा दर आज १०२ रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचला, तर ...
सांगली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची चढती कमान शुक्रवारीही कायम राहिली. पेट्रोलचा दर आज १०२ रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचला, तर डिझेल ९२ रुपयांवर गेले.
पेट्रोलने ९७ रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तीन महिने घेतले; पण आता शंभरी पार केल्यानंतर मात्र घोडदौड वेगाने सुरू ठेवली आहे. अवघ्या आठवडाभरात १००.०१ रुपयांवरून १०२ रुपयांची मजल गाठली. सांगलीत आज पेट्रोलचे प्रतिलीटर दर १००.८० रुपये होते. मिरज पूर्व भागात १०१.०५ रुपयांवर होते. कवठेमहांकाळ, जत आदी तालुक्यांतील सीमाभागात १०२ रुपयांपर्यंत होते. १०२ रुपयांपेक्षा काही पैसे कमी असले तरी प्रत्यक्षात १०२ रुपयेच द्यावे लागत होते. सांगलीत डिझेलचे दर ९१.४२ रुपये होते. अन्यत्र ९२ रुपयांनी विक्री सुरू होती. पॉवर पेट्रोलच्या किमती १०४ रुपयांना भिडल्या आहेत.
इंधन दरवाढीचा मोठा बोजा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. खरिपाचा हंगाम सुरू झाल्याने पेट्रोल-डिझेलची मागणी वाढली आहे. डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, पेरणीचे दर भरमसाट वाढले आहेत. अैाषध फवारणी पंपासाठी पेट्रोलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, त्याचाही खर्च वाढला आहे.