नाट्यगृहात भोजनावळीचा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 11:20 PM2017-07-23T23:20:54+5:302017-07-23T23:20:54+5:30
नाट्यगृहात भोजनावळीचा वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात भोजन कार्यक्रमास बंदी असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित वैद्यकीय परिषदेसाठी विनापरवाना भोजन व्यवस्था केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. नाट्यगृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाईची मागणी भाजप कार्यकर्ते प्रीतेन आसर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
मिरजेत महापालिकेने सुमारे तीन कोटी रूपये खर्चून बालगंधर्व नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहाचा मंगल कार्यालयाप्रमाणे वापर होऊ नये, यासाठी नाट्यगृह व परिसरात भोजन कार्यक्रमास बंदी घालण्यात आली आहे. मात्र मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित तीनदिवसीय शैक्षणिक परिषदेसाठी नाट्यगृहात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. नाट्यगृहात भोजन व्यवस्थेची परवानगी दिल्याची माहिती प्रीतेन आसर यांनी मागितल्यानंतर, महापालिका माहिती अधिकाऱ्यांनी परिषदेवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने नाट्यगृहाचे भाडे भरले होते. मात्र भोजनाची परवानगी देण्यात आली नसल्याचा खुलासा केला आहे.
नाट्यगृहात भोजनाची परवानगी नसताना सामूहिक भोजन व्यवस्था करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांवर कारवाई करण्याची मागणी आसर यांनी निवेदानाद्वारे केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वेगळा नियम, हा नाट्यरसिक व नागरिकांवर अन्याय असल्याचेही आसर यांनी म्हटले आहे. आता याप्रकरणी महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
पालिकेचे नियम : मोडल्याने वाद
नूतनीकरणापूर्वी मिरजेच्या याच नाट्यगृहाचा वापर मंगल कार्यालयासारखाच झाला होता. कालांतराने भंगार ठेवण्यासाठी नाट्यगृह वापरले जाऊ लागले होते. त्यामुळे महापालिकेवर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून मोठा संताप व्यक्त झाला होता. नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरुवातीपासून पथ्य पाळण्यात आले होते. आता पुन्हा जेवणावळीने नाट्यगृह वादात सापडले आहे.
सांगलीतही घडले होते प्रकार
सांगलीत महापालिकेच्या मालकीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाच्या नूतनीकरणापूर्वीही येथे जेवणावळ््यांच्या कार्यक्रमावरून वाद झाले होते. तमाशाचे कार्यक्रम, विविध संस्थांच्या सभांसाठी नाट्यगृह वापरण्यावरूनही वाद निर्माण झाले होते. बऱ्याचदा कार्यक्रमांमधील वादावादीमुळे नाट्यगृहातील खुर्र्च्यांचीही मोडतोड झाली होती.