सांगलीत गव्याचे दर्शन;नागरिकांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:49 AM2017-09-04T00:49:00+5:302017-09-04T00:49:05+5:30
सांगलीतील गजबजलेल्या गणपती मंदिराच्या पिछाडीस स्वामी समर्थ घाटावर रविवारी रात्री साडेदहा वाजता अचानक गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
सांगली : सांगलीतील गजबजलेल्या गणपती मंदिराच्या पिछाडीस स्वामी समर्थ घाटावर रविवारी रात्री साडेदहा वाजता अचानक गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील गवळी गल्ली, हरभट रोड, गणपती पेठ या गर्दीच्या ठिकाणी गवा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत या परिसरात मोठा जमाव जमला होता. शनिवारी सुखवाडी (ता. पलूस) येथे दिसलेला हा गवा नदीकाठावरून शहरात शिरला असावा, असा अंदाज आहे.
रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मगरमच्छ कॉलनी परिसरातील काही तरूणांना नदीकाठी गव्याचे दर्शन झाले. त्यांनी परिसरातील नागरिकांना याची माहिती देऊन आरडाओरड सुरू केली. पण अंधारातून काही क्षणात गवा गायब झाला. तो पुन्हा स्वामी समर्थ घाटावर दिसला. गणपती मंदिराच्या पाठीमागून तो पांजरपोळच्या दिशेने गेल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यानंतर पुन्हा गवा गायब झाला. हरभट रोड परिसरात काहींनी त्याला पाहिले.
दरम्यान, बायपास रस्ता परिसरातील शेरीनाल्याच्या पंपहाऊसजवळ काहींनी या गव्यास पाहिले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक सांगलीतील बायपास रस्ता परिसरात दाखल झाले. पथकाने बायपास रस्ता परिसरात शिवशंभो चौकापासून कर्नाळकडे जाणाºया रस्त्यावर शोध सुरू ठेवला होता. मात्र गव्याचा गणपतीपेठ परिसरातच रात्री उशिरापर्यंत लपंडाव सुरू होता.
गवा ‘एटीएम’मध्ये!
गवळी गल्लीतून हा गवा गणपती पेठेत घुसला. त्याला पाहून लोकांची पळापळ झाली. याच परिसरात असलेल्या एका एटीएममध्ये हा गवा घुसला. त्यानंतर तो काही वेळात बाहेर आला. यानंतर मोठा गदारोळ झाला.