सांगलीच्या जागेबाबत संजय राऊत-विश्वजीत कदमांमध्ये फोनवर चर्चा; तोडगा निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 09:09 PM2024-04-06T21:09:02+5:302024-04-06T21:11:13+5:30

संजय राऊत आणि काँग्रेस नेते व आमदार विश्वजीत कदम यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Phone discussion between Sanjay Raut and Vishwajit Kadam regarding Sangli seat | सांगलीच्या जागेबाबत संजय राऊत-विश्वजीत कदमांमध्ये फोनवर चर्चा; तोडगा निघणार?

सांगलीच्या जागेबाबत संजय राऊत-विश्वजीत कदमांमध्ये फोनवर चर्चा; तोडगा निघणार?

Sangli Lok Sabha ( Marathi News ) : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून वादाची ठिणगी पडली आहे. या जागेवर काँग्रेसने दावा सांगितलेला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट आपल्या उमेदवाराचीही घोषणा करून टाकली. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नाराज काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेऊन या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र सांगली दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करत आम्ही दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी व्हा, असं आवाहन केलं आहे. तसंच संजय राऊत आणि काँग्रेस नेते व आमदार विश्वजीत कदम यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

संजय राऊत सांगली दौऱ्यावर असताना विश्वजीत कदम यांच्याशी त्यांनी फोनवर चर्चा केली. सांगली जिल्ह्यात आमचे परंपरागत मतदार असल्याने ही जागा आम्ही सोडू शकत नसल्याची भूमिका कदम यांनी मांडली आहे. मात्र संजय राऊत यांच्याकडून या भूमिकेला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. तसंच तुटेपर्यंत ताणू नये, अशी काँग्रेस नेत्यांची आणि आमचीही भूमिका असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस नेत्यांना फटकारत काय म्हणाले होते राऊत?

चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत आलेल्या संजय राऊत यांनी आक्रमक शब्दांत काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला. "काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन रॅलीत सहभागी व्हावं. अन्यथा सांगलीतील जनता तुम्हाला माफ करणार नाही. सध्या सांगलीतील राजकीय वातावरण तापलं आहे. चंद्रहार पाटील प्रचारात पुढे पुढे जातील तसं इथल्या विरोधकांची डोकी तापतील. शिवसेना सांगलीत कशी हा प्रश्न भाजपासह काँग्रेसला पडलाय. परंतु हा प्रश्न जिल्ह्यातील १-२ लोकांना पडलाय, देश आणि राज्यातील नेत्यांना नाही. सांगली जिल्ह्यातील मक्तेदारी आमच्याकडेच राहावी. विशिष्ट घराण्याकडेच राहावी. ज्यांच्या हातात कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था आपल्याच ताब्यात राहाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. सामान्य शेतकऱ्याच्या मुलानं विधानसभेत, संसदेत जाऊ नये. या जनतेनं आमचे गुलाम म्हणून राहायचं असं त्यांना वाटतं. सामान्यातला सामान्य माणूस आमदार, मंत्री, खासदार, जिल्हा परिषदेत गेला पाहिजे यासाठी ही लोकशाही आहे," अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

Web Title: Phone discussion between Sanjay Raut and Vishwajit Kadam regarding Sangli seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.