कृष्णाकाठावर फुलतोय गांजा, वाळवा तालुक्यातील परिस्थिती : व्यसनमुक्तीवर भाषणबाजी करणाऱ्यानेच केली लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:20 IST2018-09-01T00:17:42+5:302018-09-01T00:20:11+5:30
वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठावरील वाळूची तस्करी गेल्या वर्षभरापासून थंडावली आहे. आता आर्थिक स्रोत कमी पडू लागल्याने तांबवे परिसरात व्यसनमुक्तीवर भाषणे ठोकणाºयाने स्वत:च्या केळीच्या बागेत चक्क गांजाची लागवड

कृष्णाकाठावर फुलतोय गांजा, वाळवा तालुक्यातील परिस्थिती : व्यसनमुक्तीवर भाषणबाजी करणाऱ्यानेच केली लागवड
अशोक पाटील ।
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठावरील वाळूची तस्करी गेल्या वर्षभरापासून थंडावली आहे. आता आर्थिक स्रोत कमी पडू लागल्याने तांबवे परिसरात व्यसनमुक्तीवर भाषणे ठोकणाºयाने स्वत:च्या केळीच्या बागेत चक्क गांजाची लागवड केली आहे. याबाबत पोलिसांची कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, परंतु हे प्रकरण दडपण्यासाठी काही नेते सरसावले आहेत.
वाळू उपशावर बंधने आल्यामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत. मात्र त्यातील एकाने तांबवे परिसरातील केळीच्या बागेत वर्षभरापासून गांजाची शेती फुलवली आहे. विशेष म्हणजे तो व्यसनमुक्तीवर व्याख्याने देत फिरतो.
ही शेती पोलिसांनी शोधून काढली. परंतु संबंधिताने हात वर केले. या गांजा शेतीशी आपला संबंध नाही. गतवर्षी वाळू उपशासाठी आलेले बिहारी कामगार गांजा ओढताना त्यातील बिया या शेतात पडून उगवल्या आहेत, अशी सारवासारवी तो करत आहे.
इस्लामपूर शहरात नुकताच पोलिसांनी गांजा हस्तगत करून येवलेवाडी येथील एकाला अटक केली आहे. संशयिताने तांबवे परिसरात काहींच्या शेतात गांजाची झाडे गेल्या दोन वर्षांपासून असल्याचे सांगितले. त्यामुळे विभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी तांबवे येथे जाऊन छापे टाकले आहेत. याप्रकरणी काहींना ताब्यातही घेतले आहे. परंतु ज्यांचे राजकीय संबंध आहेत, त्यांनी नेत्याकडे धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईला विलंब होत आहे.
...तरीही केली जात आहे शेती
गांजा वनस्पतीचे सेवन केल्याने नशा येते. सतत गांजा ओढण्याने मनुष्य त्याच्या आहारी जातो. पूर्वी गांजा चिलीममध्ये भरून ओढला जात असे. नशेसाठी गांजाला अजूनही मागणी आहे. त्यामुळेच परवानगी नसतानाही गांजाची शेती केली जात आहे.
गांजाप्रकरणी संबंधित शेतकºयास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्या शेतात अगदी थोड्याच प्रमाणात गांजाची झाडे सापडली आहेत. चौकशी सुरू आहे. यामध्ये दोषी आढळणाºयांवर कडक कारवाई करू.
- किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, इस्लामपूर