पिक्चर अभी बाकी है! : प्रतीक पाटील,, जयंतरावांच्या विरोधकांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:51 PM2018-05-29T23:51:32+5:302018-05-29T23:51:32+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक नेते आक्रमक होऊ लागले आहेत. त्यांना शह देण्यासाठी आ. पाटील यांनी दोन्ही मुलांना राजारामबापू उद्योग
अशोक पाटील।
इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक नेते आक्रमक होऊ लागले आहेत. त्यांना शह देण्यासाठी आ. पाटील यांनी दोन्ही मुलांना राजारामबापू उद्योग समूहाच्या माध्यमातून राजकीय पटलावर उतरवले आहे. इस्लामपूर येथे सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात जयंतरावांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी, ‘ये तो ट्रेलर है... पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत विरोधकांना आव्हान दिले.
विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असतानाच तालुक्यातील अनेकांनी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलाचे सचिव राहुल महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचा समावेश आहे. याची जाहिरातबाजी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ‘आता थांबायचं नाही... आता काहीही झालं तरी लढायचं...’ अशा घोषणा व्हायरल झाल्या आहेत. काहींनी तर आमदार होण्यापूर्वीच पाठीमागील बाजूस विधानभवन असलेली स्वत:ची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
याला शह देण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांना इस्लामपूर मतदारसंघात सक्रिय केले आहे. येथील राजारामबापू नाट्यगृहात आयोजित नृत्य शिबिराच्या समारोप कार्यक्रमात जयंतरावांचे पुत्र प्रतीक पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास युवकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. ती पाहून प्रतीक यांनी स्वत:चा जीवनप्रवास येथे उलगडला. परंतु जाता-जाता त्यांनी राजकीय शेरेबाजी केलीच. आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात जे सक्रिय आहेत, त्यांना प्रतीक यांनी टोला मारला की, ‘ये तो ट्रेलर है... पिक्चर अभी बाकी है...’ यातून आगामी प्रचाराच्या जबाबदारीची चुणूकही त्यांनी दाखवली.
मी केलेले वक्तव्य राजकीय नाही. नृत्याचा कार्यक्रम होता, यामुळेच मी ‘फिल्मी स्टाईल’मध्ये युवकांसमोर बोललो. आमदार जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार आमचे बंधू राजवर्धन आहेत.
- प्रतीक पाटील, युवा नेते, इस्लामपूर.