Sangli: चारधामसाठी नेलेल्या यात्रेकरूंना हरिद्वारातच सोडले, इचलकरंजीच्या ठकसेनाचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:55 PM2024-06-14T12:55:56+5:302024-06-14T12:57:45+5:30
बुधगाव : कमी खर्चात चारधाम यात्रा करण्याची संधी मिळतेय म्हणून, त्यांनी पैसे भरले... गेलेही हरिद्वारपर्यंत. मात्र तिथूनच ''त्या'' ठकसेन ...
बुधगाव : कमी खर्चात चारधाम यात्रा करण्याची संधी मिळतेय म्हणून, त्यांनी पैसे भरले... गेलेही हरिद्वारपर्यंत. मात्र तिथूनच ''त्या'' ठकसेन ट्रॅव्हल एजंटने पोबारा केल्याने, यात्रेचा नाद सोडून घरी परतण्याची वेळ ३२ यात्रेकरूंवर आली. फसवणूक झालेल्यांमध्ये माधवनगर परिसरातील २३, आष्ट्यातील ४ आणि पुण्यातील ५ जणांचा समावेश आहे. याप्रकरणी कौस्तुभ मिलिंद म्हैशाळकर, (वय ३०, रा. खोतवाडी, इचलकरंजी) या ठकसेन ट्रॅव्हल एजंटविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
इचलकरंजी जवळच्या खोतवाडी येथील कौस्तुभ म्हैशाळकर या ट्रॅव्हल एजंटने केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री अशा चारधाम यात्रेचे मागील २२ मे रोजी नियोजन केले होते. २१ हजार ५०० रुपयात प्रवास, निवास व भोजनव्यवस्था करण्याचे त्याने आश्वासन दिले होते. या यात्रेत माधवनगर परिसरातील २० महिला, ३ पुरुष असे २३ जण, आष्ट्यातील ४ आणि पुण्यातील ५ जणांनी प्रत्येकी २१ हजार ५०० रुपये भरून सहभागी झाले होते. नियोजनानुसार आष्टा, माधवनगरमधील २७ जण, स्वत: म्हैशाळकर, एक महिला व दोन पुरुष आचाऱ्यांसह मिरजेतून २२ मे रोजी रेल्वेने गेले होते.
२४ मे रोजी ते हरिद्वारला पोहोचले. हरिद्वारमध्ये एका हाॅटेलमध्ये निवास व भोजन व्यवस्था केली होती. मात्र केदारनाथसाठी आवश्यक नोंदणी केली नव्हती. नोंदणी करण्याच्या बहाण्याने तो तिथून बाहेर पडला. मात्र तीन दिवसांनंतरही तो परत तिथे गेला नाही. तो फोनही उचलत नव्हता. फसवणूक लक्षात आल्यानंतर, या यात्रेकरूंनी स्थानिक पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर त्याने हाॅटेलचे बिलही ॲानलाइनच पाठविले.
यात्रेचा मुख्य खर्च असणाऱ्या प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी प्रत्येकाने सुरुवातीलाच त्याच्याकडे पैसे दिले होते. त्यामुळे इतर खर्चासाठी पुरतील इतकेच पैसे प्रत्येकाकडे होते. त्यामुळे भांबावलेल्या या यात्रेकरूंनी परतीचा मार्ग निवडला. ऐनवेळी रेल्वे तिकिटे न मिळाल्याने, बसचा पर्याय त्यांनी स्वीकारला. मजल-दरमजल करीत तब्बल ४८ तासांच्या प्रवासानंतर सर्वजण सांगलीत पोहोचले.
कमी खर्चातील यात्रेचा मोह नडला!
सांगलीतून चारधाम यात्रेचे संयोजन करणाऱ्या यात्रा कंपन्या २८ हजारांपासून ४० हजार रुपयांपर्यंत प्रत्येकी घेतात. मात्र कमी खर्चात यात्रा करण्याचा मोहच या यात्रेकरूची फसवणूक करून गेला!
यापूर्ही ठकसेनाचा अनेकांना गंडा!
फसवणूक झालेल्यांनी त्याच्या खोतवाडी (इचलकरंजी) येथे जाऊन चौकशी केली असता, त्याने यापूर्वीही अनेकांना विविध प्रकारे गंडा घातल्याचे स्पष्ट झाले. गेमच्या नावाखाली शाळेत जाऊन विद्यार्थ्यांनाही त्याने ठकविल्याची माहिती समोर आली आहे. माधवनगर परिसरातील या यात्रेकरूंनी आता संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन, फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.