पाणी टंचाईच्या संकटावर ‘अग्रणी’ची
By admin | Published: December 6, 2015 11:21 PM2015-12-06T23:21:15+5:302015-12-07T00:24:45+5:30
मात्रा‘शिवधनुष्य’ आता गावकऱ्यांच्या हाती : नदी संरक्षित व बारमाही प्रवाहित ठेवण्याचे आव्हान
शरद जाधव-- सांगली--‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीचा पुरेपूर अनुभव यावा, असे काम खानापूर व तासगाव तालुक्यातील अग्रणी पुनरुज्जीवनाच्या निमित्ताने दिसून आले. अशक्य वाटणारी अग्रणी नदी प्रवाहित करण्याची किमया या दोन तालुक्यातील ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी लोकसहभागातून करून दाखवली. मात्र, आता ‘अग्रणी खोऱ्या’ची खरी कसोटी सुरू झाली असून, नदीपात्राच्या संरक्षणासह त्याची देखभाल आणि पुढचे अपुरे काम पूर्ण करण्याचे ‘शिवधनुष्य’ आता ग्रामस्थांना पेलावे लागणार आहे.बाराही महिने दुष्काळ सोसणाऱ्या खानापूर तालुक्यातून एका नदीचा प्रवाह वाहतो, ही तशी अशक्य कोटीतील गोष्ट. कारण अतिक्रमणांमुळे कमी झालेले पात्र आणि केवळ दमदार पावसावेळीच प्रवाहित होणाऱ्या अग्रणी नदीला अनेक ठिकाणी केवळ ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात मिळून ९० किलोमीटरचे पात्र असलेल्या अग्रणीचे खानापूर तालुक्यात २० कि.मी., तासगावात १७ कि.मी., कवठेमहांकाळात १८ कि.मी. असे ५५ किलोमीटरचे पात्र असल्याने, नदी प्रवाहित करणे गरजेचे होते. जलयुक्त शिवार योजनेतून आता अग्रणीचे काम झाले असले तरी, आता खरे काम या भागातील शेतकऱ्यांना करावे लागणार आहे. या भागाला भेडसावणारी समस्या म्हणजे नदीच्या पात्रावर होणारे अतिक्रमण. शासन आणि लोकसहभागातून हे काम पूर्णत्वास येत असले तरी, पात्र अरूंद होण्यास अतिक्रमणेच कारणीभूत आहेत. आता बहुतांश अतिक्रमणे हटविण्यात आली असली तरी, ती पुन्हा होऊ नयेत यासाठी याच भागातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.अग्रणीचे पात्र रुंदीकरणाच्या कामावेळी मोठ्या प्रमाणावर पात्रातील गाळ शिल्लक आहे. हा गाळ पात्राबाहेर तसाच राहिला, तर भविष्यात होणाऱ्या पावसाने हा गाळ पुन्हा पात्रात जाऊन पुन्हा पात्र लहान होण्याची शक्यता असल्याने, परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे हा गाळ आपल्या शेतात नेऊन टाकल्यास पात्र सुरक्षित राहणार आहे. सध्या अग्रणी नदीच्या पात्रात या भागातील गावांच्या गटारींचे पाणी आणि मैला टाकण्यात येतो. त्यामुळे पात्राला अडथळा निर्माण होणार असल्याने ‘त्या’ ग्रामपंचायतींनी गावातील गटारींचे पाणी पात्रात न सोडता, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच नदीपात्र गटारींच्या पाण्याने घाण होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. जिथे अग्रणीचा उगम होतो, त्या तामखडीपासून तालुक्यातील गावांपर्यंत आता नदीपात्राचे काम झाल्याने काठ रिकामा झाला आहे. या रिकाम्या काठावर केवळ झाडे लावून न थांबता, त्या झाडांचे चांगले संगोपन गावकऱ्यांनी केल्यास, पावसाळ्यात काठ कोसळण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
अग्रणीचे पात्र कमी असतानाही या भागाला भेडसावणाऱ्या वाळूच्या समस्येवर आता गावकऱ्यांनीच उपाय काढला आहे. बेसुमार वाळू उपशामुळे पात्र काही ठिकाणी खोल, तर काही ठिकाणी उथळ झाल्याने प्रवाहास अडचणी येत होत्या. आता लोकसहभागातून प्रवाहित झालेल्या अग्रणीतील वाळू उपशावर नियंत्रण आणल्यास त्याचा फायदा होणार आहे. नदी प्रवाहित ठेवण्यासाठी वरील उपायांबरोबरच नदीपात्र असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी केवळ बागायती पिके न घेता पीकपध्दती बदलणे आवश्यक आहे. त्यानुसार अन्नधान्य आणि कडधान्याच्या लागवडीकडे ओढा वाढविल्यास, नक्कीच अग्रणी बारमाही होणार आहे.
यंदा मान्सूनने दगा दिल्याने नोव्हेंबरपासूनच जिल्ह्यातील पूर्वभागात टंचाई परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर अग्रणीच्या झालेल्या कामामुळे टंचाई आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. केवळ अग्रणी नव्हे, तर जिल्ह्यातील इतर लुप्त होत चाललेल्या नद्यांचेही पुनरुज्जीवन होणे गरजेचे बनले आहे. नद्या प्रवाहित केल्याने काही भागातील दुष्काळ कायमचा हटण्यासही मदत होणार आहे.
बाराही महिने टंचाईच्या झळा सोसणाऱ्या या भागाला ‘अग्रणी’ नदी भगीरथाचे काम करू शकते; फक्त त्याला गरज आहे ती नदी संरक्षित करण्याची आणि प्रवाहित ठेवण्यासाठी अखंड लोकसहभागाची.
लोकसहभाग : ‘जलयुक्त शिवार’चे योगदान
कोणत्याही योजनेला लोकसहभाग मिळाला तर, होणारा कायापालट ‘अग्रणी’मुळे दिसून आला आहे. यावर्षी कमी पाऊस होऊनही पुनरुज्जीवनाचा फायदा दिसून आला आहे. भविष्यात या भागाला चांगला फायदा होणार आहे. कोणतीही योजना अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या लोकसहभागातून यशस्वी होत असते. मात्र, आता पात्र जिवंत ठेवण्याचे, प्रवाहित ठेवण्याचे मोठे काम नदीच्या लाभक्षेत्रातील गावांना, गावकऱ्यांना करावे लागणार आहे. तेव्हाच योजना खऱ्याअर्थाने यशस्वी झाली, असे म्हणावे लागेल. जलयुक्त शिवार योजनेचा फायदा होताना दिसून येत आहे, असे रोहयोच्या उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे यांनी सांगितले.
दुष्काळ शेवटचा ठरो
अग्रणीमुळे या भागातील जलस्त्रोत वाढण्यास मदत झाली आहे. दुर्लक्षित नद्याही प्रवाहित करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिल्यास कदाचित यंदाचा दुष्काळ या भागाला शेवटचा दुष्काळ ठरण्याचे स्वप्न या भागातील नागरिक बाळगून आहे.
दुर्लक्षित नद्याही प्रवाहित करण्याचे आव्हान
लुप्त होत चाललेल्या अग्रणीचे काम करत जिल्हा प्रशासनाने नदी प्रवाहित केली असताना, आता जिल्ह्यातील इतर नद्याही शासकीय योजनेतून पूर्ण करून वाहत्या करण्याची मागणी होत आहे. दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या या भागालाही दिलासा देण्यासाठी अग्रणीचा आदर्श समोर ठेवत काम केल्यास दुष्काळ काही प्रमाणात हटण्यास मदत होणार आहे.
दृष्टिक्षेपात ‘अग्रणी’.....
खानापूरजवळ तामखडी येथील अडसरवाडी येथे नदीचे उगमस्थान
उगमापासून २० कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम पूर्णत्वास
२ कोटी खर्च अपेक्षित असताना ६५ लाखात काम पूर्ण
नदीपात्रातील ३ लाख ७० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
नदीचे पात्र ५० फूट रूंद व ६ फूट खोल करण्यात आले आहे
६० ठिकाणी नवीन नालाबांधची निर्मिती