ताकारी योजनेच्या कालव्याखालील पाईप फुटला, सोनहिरा खोऱ्यातील शेती पिके धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 10:49 AM2019-05-19T10:49:14+5:302019-05-19T10:53:32+5:30
कालवा अस्तरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने पोकलँड यंत्राच्या सहाय्याने माती काढताना पाईप फुटल्याने ताकारी योजनेच्या कालव्याला भगदाड पडले.
कडेगाव - कडेगाव तालुक्यात चिंचणी-भवनीनगर रस्त्यावरील कालवा पुलालगत असलेल्या ओघळीचे पाणी कालव्याच्या खालून जाण्यासाठी सिमेंट पाईप बसवला आहे. कालवा अस्तरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने पोकलँड यंत्राच्या सहाय्याने माती काढताना हा पाईप फुटल्याने ताकारी योजनेच्या कालव्याला भगदाड पडले. यामुळे योजनेचा तिसरा टप्पा बंद करण्यात आला आहे. आधीच करपून चाललेली सोनहीरा खोऱ्यातील शेतीपिके धोक्यात आली आहेत.
अस्तरीकरणाच्या कामासाठी व ठेकेदाराची वाहने येण्याजाण्या रास्ता अरुंद आहे म्हणून ठेकेदाराने चक्क पोकलँडच्या साहाय्याने कालव्यातील माती काढून रुंदीकरणासाठी रस्त्यावर भरली त्यावेळी माती काढताना कालव्याखालून ओघळीचे पाणी जाण्यासाठी बसविलेल्या सिमेंट पाईपमधील एक पाईप फुटला. यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. विलंबाने सुरू झालेल्या ताकारी योजनेचा तिसरा टप्पा बंद झाल्यामुळे सोनहिरा खोऱ्यातील शेतीपिके धोक्यात आली आहेत. सोनहीरा खोऱ्यातील शेतकरी वर्गातील संताप व्यक्त होत आहे .
मोहित्यांचे वडगाव येथे ताकारी योजनेचा तिसरा टप्पा आहे. येथून पुढे आसद, चिंचणी, वाजेगाव, पाडळी, सोनकीरे, शिरसगाव, सोनसळ, अंबक, तडसर, हिंगणगाव (खुर्द) या गावांच्या शेतीपिकांना या कालव्याद्वारे पाणी जाते. या कालव्यात शनिवारी पाणी सोडले आणि आधीच फुटलेल्या पाईपमधून अवर्तनचे पाणी कालव्याबाहेर भवानीनगर चिंचणी रस्त्यालगतच्या नाल्यातून वाजेगावच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहून गेले. यामुळे सोनहिरा खोऱ्यातील कोमेजून चाललेल्या शेतीपिके आता वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी
ताकारी योजनेच्या चिंचणी भवानीनगर रस्त्यावर असलेल्या कालवा पुलाच्यालगत असलेल्या ओघळीवर कालव्याच्या पुलाखालून सिमेंट पाईप बसवला असल्याची माहिती योजनेच्या अधिकाऱ्यांनी जुना नकाशा पाहून देणे गरजेचे होते परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ठेकेदाराने मनमानी कारभार करीत कालव्यातील माती काढल्याने पाईप फुटली. यामुळे दोषी अधिकारी आणि चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
तातडीने पाणी द्या अन्यथा आंदोलन
भगदाड पडलेला कालवा दुरुस्तीचे काम तातडीने करून सोनहीरा खोऱ्यातील होरपळणाऱ्या शेतीला पाणी द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिरसगाव, सोनसळ, सोनकीरे, चिंचणी, वाजेगाव, तडसर, हिंगणगाव खुर्द, आसद व अंबक येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
ठेकेदाराकडून गळती काढण्याचे काम सुरू
पाईप फुटल्यावर संतप्त शेतकऱ्यांनी योजनेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले यामुळे अधिकाऱ्यांनी ठेकेदारास तातडीने गळती काढण्यास सांगितले आहे. आता ठेकेदारांनी या फुटलेल्या पाईपवर काँक्रीट टाकून गळती काढण्याचे काम सुरू केले आहे.