कवलापुरात आरोग्य यंत्रणा झाली जागी
By admin | Published: November 7, 2014 10:45 PM2014-11-07T22:45:28+5:302014-11-07T23:30:48+5:30
डेंग्यूची साथ : औषधांचे वाटप
बुधगाव : कवलापूर (ता. मिरज) येथील सौ. माधवी सावंता मुळे (वय ३२) या महिलेचे बुधवारी डेंग्यूने निधन झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आज, शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी बी. के. दळवी, मिरज पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे यांनी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन परिसराची पाहणी केली. कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व बुधगाव उपकेंद्राला भेटी देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
कवलापुरातील तुकाई मळ्यातील सौ. माधवी मुळे यांचा बुधवारी डेंग्युने मृत्यू झाला. आज अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. के. दळवी, पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे, पंचायत समिती सदस्य सतीश निळकंठ, बी. के. कांबळे यांनी माळी कुटुंबियांची भेट घेऊन परिसराची पाहणी केली. कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी शितोळे यांच्याकडून साथीच्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. कवलापुरात १४ कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये ताप, थंडीचे काही रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. शितोळे यांनी यावेळी दिली. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ‘टेमिफॉस’ औषधांचे वाटप करण्यात येत असून, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीला स्वच्छतेसह पाण्याच्या शुध्दतेबाबत काळजी घेण्याबाबत डॉ. दळवी व बुरसे यांनी सूचना दिल्या.
बुधगाव उपकेंद्रात डॉ. पी. व्ही. खंबाळकर यांच्याकडूनही त्यांनी माहिती घेतली. उपकेंद्र परिसराच्या अस्वच्छतेबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांना गावात डास प्रतिबंधात्मक औषध फवारणीचे आदेश बुरसे यांनी दिले. (वार्ताहर)
सर्वेक्षण सुरू
कवलापुरात १४ कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये ताप, थंडीच्या काही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विविध औषधांचे वाटप सुरू आहे.