नगराध्यक्ष पदासाठी दोन भाऊंच्यात तह
By Admin | Published: July 26, 2016 11:47 PM2016-07-26T23:47:42+5:302016-07-27T01:07:38+5:30
इस्लामपूर पालिका निवडणूक : आरक्षण पडल्यानंतरच मोर्चेबांधणी, अंतर्गत घडामोडींना वेग
अशोक पाटील --इस्लामपूर --प्रभाग रचना आणि आरक्षणाचा निर्णय झाला तरीही, पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष अॅड. चिमणभाऊ डांगे यांनी आपले प्रभाग निश्चित केलेले नाहीत. नगराध्यक्ष जनतेतून निवडून जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद आरक्षण खुले पुरुष पडले, तर विजयभाऊ पाटील यांना डांगे यांचा पाठिंबा राहील आणि ओबीसी आरक्षण पडल्यास विजय पाटील चिमण डांगे यांना हिरवा कंदील दाखवतील, असा अंतर्गत तह दोन भाऊंच्यात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून आहे.
पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण तारीख निश्चित होणार आहे. आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आरक्षणाची सोडत होईल. त्यामुळे इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात थोरले विजयभाऊ पाटील आणि धाकटे अॅड. चिमणभाऊ डांगे यांनी एकमेकांच्या विचाराने आगामी नगराध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्याचे ठरवले आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झाले आहे. पालिकेतील तिन्ही गटाच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांची नावे जवळ जवळ निश्चित केली आहेत. परंतु नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडून देण्याचा निर्णय झाल्याने इच्छुक असलेले पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, बी. ए. पाटील, अॅड. चिमण डांगे, आनंदराव मलगुंडे, संजय कोरे यांनी आजही आपले प्रभाग निश्चित केलेले नाहीत. तर विरोधी गटातून भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशीही यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राष्ट्रवादीची गेल्या ३० वर्षांची कारकीर्द पाहता नगराध्यक्षपद हे केवळ नामधारीच राहिले आहे. नगराध्यक्ष कोणी असला तरी, त्याच्यावर फक्त सह्याजीरावची भूमिका असते. त्यांना पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचा आदेश घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेता आलेला नाही. विजय पाटील यांना जो विरोध करेल, अशा नगराध्यक्षांना सभागृहात काम करू न देण्याच्या कारवाया पाटील यांचा गट नेहमीच करत आला आहे.
अॅड. चिमण डांगे यांनी आपला नगराध्यक्षपदाचा कालावधी पूर्णपणे यशस्वी पार पाडला आहे. यामागचे खरे रहस्य म्हणजे त्यांचे थोरले बंधू म्हणून परिचित असलेले विजयभाऊ पाटील. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चिमण डांगे यांनी आपली कारकीर्द यशस्वी केली आहे. आजअखेर हे दोघे भाऊ एकमेकांच्या विचारानेच शहरातील राजकारण करत आहेत.
आगामी पालिका निवडणुकीसाठीही हे दोघे भाऊ एकाच विचाराने मार्गक्रमण करत आहेत. नगराध्यक्ष पदासाठीही या दोघांमध्ये खलबते झाली असून, आरक्षण काय पडते, यावरच त्यांचा एकमेकांना पाठिंबा राहणार आहे. यदाकदाचित नगराध्यक्षपदासाठी खुले महिला आरक्षण पडल्यास या जागेवरच फक्त सौ. अरुणादेवी पाटील यांनाच संधी मिळणार आहे. याकडे आता लक्ष लागले आहे.
कोण काय म्हणाले?
आमच्या घरातील कोण उमेदवार असणार, याबाबत आजही निर्णय झालेला नाही. नगराध्यक्ष पदाचे काय आरक्षण पडेल, त्यावर प्रभागातील उमेदवार निश्चित होणार आहे. याचा निर्णय पक्षप्रतोद विजयभाऊ पाटीलच घेतील.
- शहाजीबापू पाटील,
नगरसेवक, इस्लामपूर
मी ही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. नगराध्यक्ष पदाचे ओबीसी आरक्षण पडल्यास माझे बंधू चिमण डांगे यांना उमेदवारी मिळेल. प्रभाग ९ मध्ये सध्या आमच्याच पार्टीचे बाळासाहेब पोरवाल यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी निवडणूक लढवली नाही, तर आपण विचार करू.
- विश्वास डांगे,
माजी नगरसेवक, इस्लामपूर