विस्तारित भागातील सांडपाणी निचऱ्यासाठी योजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:31+5:302021-03-09T04:30:31+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात उपनगरे, विस्तारित भागात पावसाचे साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी सांडपाणी निचरा करणारी योजना महापालिकेने हाती घ्यावी. ...
सांगली : महापालिका क्षेत्रात उपनगरे, विस्तारित भागात पावसाचे साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी सांडपाणी निचरा करणारी योजना महापालिकेने हाती घ्यावी. यासाठी तातडीने प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा व महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी हरित न्यायालयात आठ दिवसांत याचिका दाखल करणार असल्याचे नगरसवेक अभिजीत भोसले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
भोसले म्हणाले, महापालिका स्थापन होऊन २२ वर्षे झाली, मात्र अद्याप उपनगरे व विस्तारित भागातील सांडपाणी निचरा करणारी कोणतीही व्यवस्था महापालिकेने निर्माण केली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचून विस्तारित भागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. या भागातील जमिनीची पाणी शोषण करण्याची क्षमताही आता संपली आहे. त्यामुळे शोषखड्डे भरून वाहत आहेत, कूपनलिकांना दूषित पाणी लागत आहे. याकडे महापाालिकेने दुर्लक्ष केले आहे. हिवताप, मलेरिया यासह कीटकजन्य आजाराचे प्रमाण विस्तारित भागातील नागरिकांमध्ये जास्त आहे, असा अहवाल हिवताप कार्यालयाने दिला आहे. तरीही पालिकेला जाग येताना दिसत नाही. त्यामुळे आता या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. विस्तारित भागातील सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न केवळ नागरिकांच्या आरोग्याचा नाही तर पार्यावरणाचाही आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. त्यामुळे हरित न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भोसले म्हणाले, महापालिकेच्या २०१० मधील एका स्थायी समितीत तसेच २०१५ मधील महासभेत विस्तारित भागातील सांडपाणी निचरा करण्यासाठी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला, तसा ठरावही झाला. मात्र यावर आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. वास्तविक या कामासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला पाहिजे. त्यानुसार योजना राबवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दरवर्षी त्यावर खर्च केला पाहिजे. येत्या चार-पाच वर्षांत ही योजना पूर्ण केली पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी या मागणीसाठी महापालिका, आरोग्य विभाग, नगरविकास विभाग यांच्याविरोधात हरित न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. ॲड. असिम सरोदे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
चौकट
हिवताप विभागाचा अहवाल, रुग्णसंख्या जादा
अभिजित भोसले म्हणाले, विस्तारित भागातील पावसाळी पाणी, सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील जमिनीची पाणी शोषण करण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी निचरा न होता ठिकठिकाणी साचून राहते. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. विस्तारित भागात हिवताप व अन्य कीटकजन्य आजारांचे रुग्ण जास्त असल्याचा अहवाल या विभागाने दिला आहे.